मंगळवारी संध्याकाळी आंदोलनाची सांगता झाल्यानंतर या उरलेल्या भाकऱ्या, पाण्याच्या बाटल्या, चटणी, ठेचा, लोणचे यासह इतर अन्नपदार्थ वाया जाऊ नयेत म्हणून मराठा आंदोलकांनी ते गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांनी या अन्नसाहित्याचे वर्गीकरण करून वितरणाची व्यवस्था केली. उरलेले अन्न व पाणी सायन रुग्णालय, जे. जे. रुग्णालय तसेच विविध अनाथाश्रमांमध्ये पोहोचवण्यात आले. त्यामुळे आंदोलनादरम्यान लोकांनी केलेली मोठी मदत फुकट न जाता योग्य ठिकाणी पोहोचली.
गावागावांतून सामान्य नागरिकांनी कुवतीप्रमाणे वर्गणी काढून ही मदत मुंबईत पाठवली होती. भाकरी, पोळी, चिवडा, फरसाण, खर्डा, ठेचा, लोणचे, पाण्याच्या बाटल्या अशा विविध साहित्याने सिडको प्रदर्शन केंद्र अक्षरशः गजबजून गेले होते. संपूर्ण शहराला जेवण देता येईल एवढा साठा झाल्याने आंदोलनकर्त्यांनी मदत थांबवण्याचे आवाहन केले होते. तरीही या अन्नदानातून एक वेगळाच सामाजिक संदेश देण्यात आला. आंदोलनानंतरही “अन्न वाया घालवायचं नाही, तर गरजूंना द्यायचं” अशी भूमिका मराठा समाजाने घेतल्याने समाजातील ऐक्य व संवेदनशीलता पुन्हा अधोरेखित झाली.