मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त १७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा देशभरात साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत युवकांमध्ये क्रीडाप्रेम जागविण्यासाठी व निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी देशभरातील ७५ ठिकाणी नमो मॅरेथॉन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय युवा कार्य व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दिली. या संदर्भात झालेल्या दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत डॉ. मांडविया यांनी राज्यांच्या क्रीडा मंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय युवा कार्य व क्रीडा विभागाचे सचिव हरिरंजन राव उपस्थित होते. राज्याचे क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्यासह विविध राज्यांचे क्रीडा मंत्रीही उपस्थित होते. मंत्री डॉ. मांडविया म्हणाले की, युवकांचे आरोग्य सक्षम ठेवणे आणि त्यांच्यात राष्ट्रप्रेम जागवणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे या कार्यक्रमांना प्रत्येक राज्याने सक्रिय सहभाग देऊन यशस्वी करावे.
पंधरवड्यात २१ सप्टेंबर रोजी ७५ ठिकाणी नमो मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे. तर, यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर : एकतेचा संदेश देणाऱ्या पदयात्रेचे आयोजन देशभर करण्यात येणार आहे. याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यांत तीन दिवस एकता, राष्ट्रप्रेम, एक भारत श्रेष्ठ भारत व विकसित भारत यांचा संदेश देणाऱ्या पदयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.
भारतात नशा मुक्त भारत अभियान राबविण्यात येणार आहे. देशभरातील १०० सामाजिक व अध्यात्मिक संस्थांचा सहभाग घेऊन हे अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच संसद खेल महोत्सवाचे आयोजनही करण्यात येणार असून, राज्यांनी यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी यावेळी केले.