खार्टुम : अफगाणिस्तानातील भूकंपाच्या भीषण धक्क्यातून जग अजून सावरतही नाही, तोच आता सुदानमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुदानच्या पश्चिमेकडील दारफूर प्रांतात सोमवारी भूस्खलनाची मोठी दुर्घटना झाली. या भूस्खलनात सुमारे १००० जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले. ही दुर्घटना तारासीन गावात घडली असून हे गाव मध्य दारफूरच्या माराह पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे. काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्वतरांगांमध्ये मोठ्या प्रमाणात ढासळणं झालं आणि गाव अक्षरशः जमीनदोस्त झाले. तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या काळातील ही घटना सुदानमधील सर्वात मोठ्या नैसर्गिक आपत्तींपैकी एक मानली जात आहे. बचावकार्य अत्यंत कठीण परिस्थितीत सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गावचं गाव पुसलं, तब्बल १००० लोकांचा मृत्यू
सुदानमधील दारफूर प्रांतात घडलेल्या भूस्खलनाने एक गाव अक्षरशः नकाशावरून पुसलं गेलं आहे. तारासीन गावात राहणारे जवळजवळ सर्व लोक मृत्युमुखी पडल्याचे प्राथमिक अहवालांमध्ये समोर आले आहे. फक्त एकच व्यक्ती जिवंत राहिल्याची माहिती स्थानिक संस्थांनी दिली आहे. सुदान लिबरेशन मूव्हमेंट-आर्मीने दिलेल्या माहितीनुसार, या भूस्खलनात अंदाजे एक हजार लोकांचा बळी गेला आहे. गावातील प्रत्येक घर जमीनदोस्त झालं असून संपूर्ण भाग उद्ध्वस्त झाला आहे. या आपत्तीनंतर संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय मदत संस्थांना तातडीने मदतीसाठी आवाहन करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली गाडलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे, मात्र परिस्थिती अतिशय गंभीर आणि भीषण असल्याने कामाला विलंब होत आहे. स्थानिक माध्यमांनी एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये पर्वतरांगांमधील संपूर्ण भाग सपाट झाल्याचे भीषण दृश्य दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, हा भूस्खलन सुदानमधील सर्वात मोठ्या नैसर्गिक आपत्तींमध्ये गणला जात आहे.
मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनाला वेग आल्याने राज्य सरकारवर न्यायालयीन दडपण वाढले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या ...
गृहयुद्धाच्या ज्वाळांमध्ये सुदान
एप्रिल २०२३ पासून राजधानी खार्तूमसह अनेक भागांमध्ये सैन्य आणि निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) यांच्यात रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. गेल्या दीड वर्षाच्या या युद्धात हजारो लोकांचा बळी गेला असून लाखो लोकांना घरदार सोडून पलायन करावे लागले आहे. या संघर्षामुळे विशेषतः माराह पर्वतरांग आणि दारफूर प्रदेश संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय मदत संस्थांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. येथे मदत पोहोचवणे, अन्नसामग्री, वैद्यकीय सेवा किंवा आश्रयाची व्यवस्था करणे अशक्यप्राय झाले आहे. अशा वेळी दारफूरमध्ये आलेल्या भीषण भूस्खलनाने या युद्धपीडित प्रदेशावर संकटांची भर टाकली आहे. एका बाजूला मानवनिर्मित युद्ध तर दुसऱ्या बाजूला नैसर्गिक आपत्ती, अशा दुहेरी संकटांनी सुदानमधील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे.
१६० किमी लांबीच्या ज्वालामुखी पर्वतरांगेत विस्थापित कुटुंबांचा आश्रय
सुदानमधील गृहयुद्ध आणि नैसर्गिक आपत्तीच्या छायेत असलेल्या हजारो विस्थापित कुटुंबांनी आता माराह पर्वतरांगांमध्ये आसरा घेतला आहे. दारफूर आणि कोर्डोफान भागात सक्रिय असलेले अनेक बंडखोर गट याठिकाणी कार्यरत आहेत. त्यामध्ये सुदान लिबरेशन मूव्हमेंट-आर्मी (SLM-A) हा प्रमुख गट असून त्यांनी सध्या सुरू असलेल्या संघर्षात कोणत्याही बाजूशी आपली नाळ जोडलेली नाही. माराह पर्वतरांगा अल-फशरच्या नैऋत्येला पसरलेली १६० किमी लांबीची ज्वालामुखी पर्वतरांग असून हा परिसर राजधानी खार्तूमपासून जवळपास ९०० किमी अंतरावर आहे. युद्ध आणि सततच्या हल्ल्यांमुळे घरदार गमावलेल्या हजारो कुटुंबांनी या दुर्गम पर्वतीय भागात आसरा घेतला आहे. मात्र, या प्रदेशात मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याने विस्थापितांच्या जगण्याची लढाई आणखी कठीण होत आहे.