मुंबई : सिंकफिल्ड बुद्धिबळ करंडकात दुसरे स्थान मिळवलेल्या भारताच्या आर. प्रज्ञानंद याने फिडे क्लासिकल बुद्धिबळ क्रमवारीत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. आर. प्रज्ञानंद याला २७८५ एलो रेटिंगची कमाई करता आलेली आहे. नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन हा २८३९ रेटिंगसह पहिल्या स्थानावर कायम आहे. मॅग्नस कार्लसन हा विश्व अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सहभागी होत नाही. तसेच डी. गुकेश हा वर्तमान विश्वविजेता आहे. तरीही मॅग्नस कार्लसन हा क्लासिकल प्रकारात रेटिंगच्या जोरावर पहिल्या स्थानावर विराजमान आहे. त्यानंतर दोन स्थानांवर अमेरिकन खेळाडूंचे वर्चस्व प्रकर्षाने दिसून येत आहे. हिकारु नाकामुरा हा २८०७ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर असून, फॅबियानो कारुआना २७८९ रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या तीन पुरुष खेळाडूंचा फिडे क्लासिकल अव्वल १० क्रमवारीत समावेश आहे. आर. प्रज्ञानंद चौथ्या स्थानावर आहे. तसेच अर्जुन एरीगेसी २७७१ रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे. शिवाय डी. गुकेश २७६७ रेटिंगसह सहाव्या स्थानावर आहे. महिलांच्या अव्वल २० खेळाडूंच्या क्रमवारीत कोनेरू हंपी, दिव्या देशमुख व द्रोणावल्ली हरिका या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. कोनेरू हंपी पाचव्या स्थानावर आहे. विश्वविजेती दिव्या देशमुख १४व्या स्थानावर आहे. तसेच द्रोणावल्ली हरिका १९व्या स्थानावर आहे.
पुरुष विभागातील सर्वोत्तम सहा खेळाडू
१) मॅग्नस कार्लसन (नॉर्वे) - २८३९ रेटिंग
२) हिकारू नाकामुरा (अमेरिका) - २८०७ रेटिंग
३) फॅबियानो कारुआना (अमेरिका) - २७८९ रेटिंग
४) आर. प्रज्ञानंद (भारत) - २७८५ रेटिंग
५) अर्जुन एरीगेसी (भारत) - २७७१ रेटिंग
६) डी. गुकेश (भारत) - २७६७ रेटिंग
महिला विभागातील सर्वोत्तम सहा खेळाडू
१) होऊ यिफान (चीन) - २६०९ रेटिंग
२) जू वेनजुन (चीन) - २५७० रेटिंग
३) लेई टिंगजी (चीन) - २५६५ रेटिंग
४) झू जिनर (चीन) - २५४८ रेटिंग
५) कोनेरू हंपी (भारत) - २५३५ रेटिंग
६) मुझीचूक ॲना (युक्रेन) - २५३५ रेटिंग