मुंबई: संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून, राज्यभरातून अनेक लोकं या दिवसात मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात. गेल्या काही वर्षापासून लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असून, या गर्दीचे व्यवस्थापन करण्याचे मोठे आव्हान सार्वजनिक मंडळ ट्रस्ट तसेच प्रशासनाला आहे. इतकेच नव्हे तर लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळात होणाऱ्या व्हीआयपी आणि नॉन व्हीआयपी (VIP) दर्शनात केला जाणारा भेदभाव देखील आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यामुळे या व्यवस्थेविरोधात महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडे औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुंबईतील अॅड.आशीष राय आणि पंकज मिश्रा यांनी ही तक्रार आयोगासमोर दाखल केली. त्यांचा आरोप आहे की, सार्वजनिक उत्सव असूनही दर्शनासाठी व्हीआयपी आणि नॉन व्हीआयपी अशी वेगळी रांग लावून सर्वसाधारण भक्तांच्या भावनांचा अनादर होत आहे. तसेच सर्वसामान्यांना तासन तास रांगेत उभे राहावे लागते, तर काही मोजक्यांना विशेष सवलत मिळते, हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे, अशी आयोगाकडे त्यांनी तक्रार करताना म्हटले आहे.
दर्शन सर्वांसाठी समान आणि सुलभ करण्याची मागणी
संबंधीत तक्रारदारांनी आयोगाकडे मागणी केली आहे की, गणेशोत्सव हा लोकउत्सव असल्याने दर्शन सर्वांसाठी समान आणि सुलभ असावे. दर्शन व्यवस्थेत भेदभाव टाळावा आणि सामान्य भाविकांना न्याय द्यावा.
मानवाधिकार आयोगाने या तक्रारीची दखल घेऊन पुढील सुनावणीसाठी संबंधितांना नोटीस पाठविण्याची शक्यता आहे. ही कारवाई झाल्यास, राज्यातील इतर गणेश मंडळांच्या दर्शन व्यवस्थांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोशल मीडियावर या व्हीआयपी आणि नॉन व्हीआयपी दर्शन रांगेचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळेच, मानवाधिकार आयोग नेमकं काय भूमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.