खेड्याकडे चला

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ


आईच्या पेन्शन बँकेत तिचे ‘केवायसी’ करायचे म्हणून मी इंडियन बँकेत गेले होते. काऊंटरपुढे भली मोठी रांग होती. बँक मॅनेजरचा चेहरासुद्धा दिसत नव्हता. समोर दोन-तीन माणसे राहिल्यावर मला ती काऊंटरमागची खुर्चीवर बसलेली, चिडचिड करणारी, वैतागलेली बाई दिसू लागली. दोन-तीन माणसांना हे नाही, ते नाही करत तिने तिथून वळते केले. आता माझ्यासमोर एक तरुण मुलगा आणि त्याच्यामागे मी असे राहिलो. माझ्यामागे बरीच मोठी रांग होती. त्या बाईचे आणि त्या तरुण मुलाचे संभाषण मला व्यवस्थित ऐकू येत होते. तो तिला सांगत होता की, माझ्याकडे पासबुक, चेकबुक काहीही नाही; परंतु ओरिजिनल पॅन कार्ड आणि आधार कार्ड मात्र आहे. तिने हरप्रकारे त्याचे अकाऊंट शोधण्याचा प्रयत्न केला; परंतु तिला काही तो सापडेना. शेवटी त्यालाही हाकलून देण्याच्या प्रयत्नात ती होती. तितक्यात तो म्हणाला, “मॅडम केवायसी करा, असा माझ्या मोबाइलवर एसएमएस आलाय त्यामुळे तुम्हाला कदाचित त्याच्यावरून शोधता आलं तर पाहा.” त्या एसएमएसमध्ये त्याच्या बँकेतील अकाऊंटचे शेवटचे काही नंबर फक्त दिसत होते त्याच्या आधी टिंब टिंब टिंब होते. ती वैतागली. म्हणाली, “नाही शोधता येणार.” शेवटचा उपाय म्हणून तो तरुण म्हणाला, की नाशिकच्या एका छोट्याशा खेडेगावात त्याने आता कायमचेच वास्तव्य केले आहे. तो पहिल्यांदाच मुंबईला, चार वर्षांनंतर आलाय. तो कदाचित पुढे तीन-चार वर्षे येऊ शकणार नाही. काही करता आले तर पाहा. अशी तो विनवणी करू लागला. कसे कोणास ठाऊक, त्या बाईला दया आली आणि तिने त्याचा अकाऊंट नंबर शोधून काढला. खरंतर हे ती आधीही करू शकत होती हे माझ्या लक्षात आले. असो. त्याचे केवायसी करताना ती त्याच्याशी गप्पा मारत होती त्यातून मला कळले, की तो पदवीधर असून नोकरी नसल्यामुळे मुंबईत रिक्षा चालवायचा. जेव्हा कोरोनामुळे लॉकडाऊन लागले तेव्हा तो कसातरी गावापर्यंत पोहोचला आणि त्यांनी सात-आठ महिने शेती केली. रिक्षापेक्षा शेतीमध्ये उत्पन्न जास्त मिळाले. याशिवाय तिकडचे हवामान त्याला मानवले. त्यामुळे त्याने कायमचे तिथे राहण्याचा निर्णय घेतला. रिक्षावाल्याचा एक ‘आनंदी आणि समाधानी शेतकरी’ झाला याचा आनंद मलाही झाला. नशिबाने त्याचे केवायसी पूर्ण झाले आणि तो तिथून निघून गेला. त्यानंतर माझा नंबर आला; परंतु माझ्या आईचे केवायसी त्यांच्या आडमुठ्या धोरणानुसार झाले नाही. असो. ही घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी दुपारी अचानक एक बातमी वाचनात आली. ती बातमी अशी होती -


अभिषेक रेड्डी नावाचा एक २५ वर्षीय तरुण, १.५ कोटींच्या नोकरीचा राजीनामा देऊन आता मनालीत शेती करून व्यवस्थित पैसा कमावत आहे. शांतता आणि समाधानाने आयुष्य व्यतीत करत आहे. अभिषेक, वयाच्या २३व्या वर्षी एका स्टार्टअपमध्ये ‘क्रिएटिव्ह डायरेक्टर’ म्हणून नोकरीला लागला. त्याला १.५ कोटी रुपये इतकी मोठी वार्षिक पगाराची नोकरी असूनही तो शाश्वत शेतीकडे वळला. सतत १५–१६ तास काम करून त्याला मानसिक थकवा येत होता. खरी शांती तो निसर्गातच शोधत होता. सुरुवातीला आंध्र प्रदेशातील अनंतपूरजवळील पामीडी गावात पाच एकर जागा विकत घेऊन शाश्वत शेती


(Permaculture) सुरू केली. स्वतःच्या हातांनी बियाणं पेरून, पाण्याच्या साठवणुकीसाठी विहीर खोदून कोरड्या जमिनीत जीवन फुलवले. ही शेती केवळ उत्पन्नाचे साधन नव्हते, तर ते त्याच्या आत्मशोधाचा एक भाग होते, असे म्हणायला काहीच हरकत नाही. सुरुवातीला थोडा त्रास झाला पण हळूहळू ₹२५,००० पर्यंत मासिक उत्पन्न मिळू लागले. अभिषेकने निर्णय घेतला, की ही शांतता पुरेशी नाही, तर आपल्या माणसांची सोबत हवी. त्यामुळे आता तो मनालीच्या डोंगरात पुन्हा एकदा आपल्या माणसांसोबत नव्याने शेती करायला सुरुवात करत आहेत. ‘शेती हा फक्त व्यवसाय न राहता जीवनशैली बनवण्याची कला त्याने आत्मसात केली आहे.’ माणसांनी एकमेकांची घेतलेली मदत आणि जोपासलेले भावनिक नाते यामुळे अभिषेक आणि त्यांच्या बरोबरीचे सगळेच आनंदी आहेत. या सगळ्यांमध्ये त्याचे एक वाक्य मला फार आवडले आणि ते वाक्य असे आहे - शेतात जशा आपण बिया पेरतो तशी ‘शांती’सुद्धा पेरण्याची गरज आहे. त्या शांतीला काळजीपूर्वक जोपासले तर ती सर्वार्थाने वाढते!


मोठ्या प्रमाणात तरुणाई जर शेतीकडे वळली आणि योग्य तंत्रज्ञान वापरून त्यांनी नैसर्गिक शेती जोपासली गेली तर येणाऱ्या नवीन पिढीचे आरोग्य निश्चितपणे सुधारेल आणि गांधीजींनी दिलेला संदेश ‘खेड्याकडे चला’ हा आजच्या काळच्या तरुणांसाठीसुद्धा लागू होतोय! ‘आत्मनिर्भर गाव’ वसवण्यासाठी ‘अभिषेक’सारख्या असंख्य तरुणांकडे आपण आशेने पाहू शकतो!

Comments
Add Comment

मनाची श्रीमंती!

कथा : रमेश तांबे दिवाळी नुकतीच संपली होती. दिवाळीचे चार-पाच दिवस कसे संपले हे नमिताला कळलेच नव्हते. दिवाळी येणार

पारदर्शक पदार्थ

कथा : प्रा. देवबा पाटील सीता व निता या दोघी बहिणींना जशी अभ्यासाची गोडी होती तशीच वाचनाचीसुद्धा आवड होती. त्या सतत

बदलांचा स्वीकार!

खरे तर बदलांचा स्वीकार करणे याला खूप चांगला इंग्रजी शब्द आहे ऍडॉप्शन! आपण कितीही मनात आणले तरी आपल्याला हवे तसे

कचरा कचराकुंडीतच टाकावा !

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर ‘स्वच्छ मुंबई ,सुंदर मुंबई ‘ असे फलक मुंबईत ठिकठिकाणी आपण पाहतो. अनेक

सूर्यप्रकाशाचे रंग

कथा : प्रा. देवबा पाटील सीता आणि नीता या सख्ख्या बहिणीच असल्याने दोघींचे आपसातही छान मेतकूट जमायचे. दोघीही नेहमी

खरी पूजा

कथा : रमेश तांबे अजितच्या घराजवळच गणपतीचं एक मंदिर होतं. त्याची आजी दररोज सकाळी पूजेसाठी मंदिरात जायची. जवळजवळ