वॉशिंग्टन डीसी: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बने जगातील अनेक देशातील आर्थिक व्यवस्था विस्कळीत केली आहे. ज्यामध्ये भारत आणि चीन सारख्या अनेक देशांचा समावेश आहे, इतकेच नव्हे तर, ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा फटका अमेरिकेला देखील बसत असल्यामुळे गेले काही महीने ट्रम्प जगभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. मात्र आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ते एका भलत्याच गोष्टीमुळे खूप ट्रेंड होत आहेत. ट्रम्पवर नाराज असलेल्या लोकांनी X वर ‘ट्रम्प इज डेड’ असं लिहायला सुरुवात केली आहे. पाहता पाहता १ लाख ४४ हजारांहून अधिक लोकांनी अशी पोस्ट केली आहे. त्यामुळे अल्पावधीतच "ट्रम्प वारले" (Trump is Dead) हा हॅशटॅग प्रचंड ट्रेंड झाला आहे.
याआधी ट्रम्प यांच्या आरोग्याबाबत अनेक अफवा समोर आल्या होत्या. मात्र सध्याची अफवा ही सर्वात जास्त चर्चेत आली आहे.
ट्रम्प यांच्या प्रकृतीसंबंधित बातम्यांना उधाण
वाऱ्याच्या वेगाने पसरत चाललेल्या या पोस्टमुळे ७९ वर्षीय डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीसंबंधित नावनवीन् बातम्या देखील समोर येऊ लागल्या आहेत. ज्यामुळे ट्रम्प यांची प्रकृती बिघडली तर नाही ना असाही सवाल विचारला जात आहे. मुळात, जुलैमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची प्रकृती किरकोळ कारणांमुळे खालावली होती, मात्र आता ते पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे व्हाईट हाऊसद्वारे सांगण्यात आले आहे.
अफवा का पसरली?
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी २७ ऑगस्ट रोजी यूएसए टुडेला एक मुलाखत दिली होती. यावेळी राष्ट्राध्यक्षाबद्दल त्यांनी केलेल्या विधानामुळे एकच खळबळ उडाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीविषयी बोलताना त्यांनी, ट्रम्प हे सध्या पूर्णपणे निरोगी आणि स्वस्थ आहेत. त्यांची तब्येत खूप चांगली आहे असं व्हान्स यांनी म्हटलं होतं. मात्र जेडी व्हान्स यांनी काही आपात्कालिन परिस्थिती उद्भवली आणि माझी गरज भासली तर ती नेतृत्व करण्यास तयार आहे. कारण मला गेल्या २०० दिवसांमध्ये चांगले प्रशिक्षण मिळाले आहे. देव न करो, पण एखादी भयानक घटना घडली तर मला मिळालेले प्रशिक्षण फायदेशीर ठरु शकते, असे विधान केले होते. ज्यामुळे ट्रम्प यांची प्रकृती चांगली नसल्याचे ते संकेत असावे असे तर्कवितर्क अनेकांनी काढले.
ट्रम्प हे सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष
ट्रम्प हे ७९ वर्षाचे असून, ते अमेरिकेचे सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यामुळेच त्यांच्या प्रकृती संदर्भात अनेक चर्चा दिवसाआड रंगत असतात. तर जेडी व्हान्स ४१ वर्षाचे असून, याप्रकारे अमेरिकेच्या इतिहासातील तिसरे सर्वात तरुण उपराष्ट्राध्यक्ष आहेत.