रत्नागिरी : चालत्या गाडीत चढू नये किंवा चालत्या गाडीतून उतरू नये असे आवाहन रेल्वे प्रशासन वारंवार करते. पण अनेकजण या आवाहनाकडे दुर्लक्ष करतात. यामुळेच रेल्वेच्या हद्दीत दुर्घटना घडतात. ताजी घटना कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकात घडली. चालत्या गाडीतून तरुण चुकीच्या पद्धतीने उतरला. यामुळे तरुणाचा तोल गेला आणि तो रेल्वे खाली जाऊ लागला. पण फलाटावर असलेल्या दोन आरपीएफ जवानांनी तसेच एका विक्रेत्याने सतर्कतेने तरुणाचे प्राण वाचवले. या घटनेचे धक्कादायक सीसीटीव्ही फूटेज व्हायरल होत आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस - सावंतवाडी गाडी शनिवार ३० ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून ४१ मिनिटांनी रत्नागिरीच्या फलाट क्रमांक एक वर आली. ही गाडी फलाटावर येऊन पूर्ण थांबण्याआधीच एका तरुणाने उतरण्याचा प्रयत्न केला. चालत्या गाडीतून तरुण चुकीच्या पद्धतीने उतरला. यामुळे तरुणाचा तोल गेला आणि तो रेल्वे खाली जाऊ लागला. तरुण संकटात असल्याची जाणीव होताच फलाटावर असलेल्या दोन आरपीएफ जवानांनी तसेच एका विक्रेत्याने सतर्कतेने तरुणाचे प्राण वाचवले. तिघांनी रेल्वे खाली जात असलेल्या तरुणाला वेगाने खेचले. त्यामुळे तरुणाचे प्राण वाचले.
कोकण रेल्वेचे आरपीएफ जवान रणजीत सिंह आणि महेंद्र पाल तसेच विक्रेता वीर सिंग यांनी तरुणाला वाचवले. मिळालेल्या माहिती नुसार तरुण गोळप रत्नागिरी येथील निवासी होता. जखमी तरुणावर कोकण रेल्वेच्या पथकाने तात्काळ प्रथमोपचार केले आणि पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले. कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी आरपीएफ जवान रणजीत सिंह आणि महेंद्र पाल तसेच विक्रेता वीर सिंग यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे बक्षीस प्रदान केले आणि तिघांचे कौतुक केले.