मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मुंबईत आज वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली होती. काही मराठा आंदोलक हे आझाद मैदानानजीक मुंबई महापालिकेच्या समोर येऊन ठिय्या आंदोलनाला बसले होते. यामुळे मोठी वाहतूककोडीं झाली. सलग दुसऱ्या दिवशी ईस्टर्न फ्री वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत. ज्याबद्दल राज ठाकरे यांना काही पत्रकारांनी प्रश्न केले. यावर राज ठाकरे यांनी, याबद्दल एकनाथ शिंदे बोलू शकतील असे सांगितले.
काय म्हणाले राज ठाकरे?
मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील या विषयावर राज ठाकरे यांनी खूप सूचक प्रतिक्रिया दिली. “मराठा आरक्षणासंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तर एकनाथ शिंदेंच देऊ शकतील. जरांगे परत का आले याचं उत्तर तेच देऊ शकतील” असं राज ठाकरे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मुंबईकरांना त्रास होतोय. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, “मागच्यावेळी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे येत असताना एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत जाऊन प्रश्न सोडवलेला ना, मग हे परत का आले?” असं राज ठाकरे म्हणाले.