बीएमसीकडून आझाद मैदान परिसरात मोर्चेकऱ्यांसाठी निरनिराळ्या नागरी सेवा-सुविधा


मुंबई : मराठा समाजबांधवांच्या मागण्यांच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रभरातून आलेल्या आंदोलकांची संख्या लक्षात घेता, नागरिकांच्या सोयीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने निरनिराळ्या नागरी सोयी - सुविधा पुरवल्या आहेत. पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे, स्वच्छता, आरोग्य यासह आवश्यक त्या सर्व पुरवण्यात येत आहेत. तसेच, सोयी - सुविधांमध्ये कमतरता राहू नये, यादृष्टिने अतिरिक्त अधिकारी, कर्मचारी, कामगार यांची देखील प्रशासनाने नियुक्ती केली आहे.


दैनंदिन कामकाजाच्या पलीकडे सद्यस्थितीतील पावसाळा तसेच सध्या सुरु असलेला श्रीगणेशोत्सव या पार्श्वभूमीवर मुंबईकर नागरिकांना महानगरपालिका प्रशासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या सेवा - सुविधा सुरळीत राहाव्यात, यासाठी संपूर्ण यंत्रणा नियोजनबद्धरित्या तसेच अथकपणे कार्यरत आहे.


दरम्यान, काल दिनांक २९ ऑगस्ट २०२५ पासून आझाद मैदानावर मराठा समाजबांधवांचे आंदोलन सुरु आहे. त्यासाठी राज्यभरातून आलेल्या आंदोलकांची संख्या लक्षात घेता आझाद मैदान व परिसरांमध्ये आंदोलन नागरिकांना अत्यावश्यक, मूलभूत नागरी सेवा - सुविधा महानगरपालिकेच्या वतीने पुरवण्यात येत आहेत. ए विभाग कार्यालयासह परिमंडळ एक मधील सर्व विभाग कार्यालये, इतर संबंधित खाती यांच्याकडून योग्य ती कार्यवाही सुरु आहे. त्याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.


१) सततच्या पावसामुळे, आझाद मैदानावर झालेला चिखल हटवण्यात आला. तसेच प्रवेशमार्गावरट्रक खडी टाकून मार्ग समतल करण्यात आला.


२) आझाद मैदान परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी, विशेषतः सायंकाळी व रात्री पुरेसा उजेड असावा, यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या वाहनआरुढ, प्रखर झोताचे ३ विद्युत दिवे उभारण्यात आले आहेत.


३) आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याचे १२ टँकर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार अतिरिक्त टँकर्स मागविले जात आहेत.


४) आंदोलनस्थळ व परिसरात सुमारे ५०० पेक्षा अधिक स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत सातत्याने स्वच्छता केली जात आहे. त्यासाठी परिमंडळ १ मधील ए, बी, सी, डी व ई या पाचही विभाग कार्यालयांमधून अतिरिक्त मनुष्यबळ आणून समर्पित कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.


५) आंदोलकांची संख्या लक्षात घेता, आझाद मैदान परिसरात २४ तास कार्यरत असा वैद्यकीय मदत कक्ष उभारणी करण्यात आली आहे. त्याद्वारे गरजुंना आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहे. यात, ४ वैद्यकीय पथक आणि २ रुग्णवाहिका मैदान परिसरात कार्यरत आहे. महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयाकडून देखील याठिकाणी वैद्यकीय पथक नेमण्यात आले आहे. आवश्यकता भासली तर रुग्णांना गोकुळदास तेजपाल (जी.टी.) रुग्णालय, नायर रुग्णालय, कामा रुग्णालय, बॉम्बे रुग्णालय येथे संदर्भित केले जाईल. त्यादृष्टिने संबंधित रुग्णांशी समन्वय साधण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, राज्य शासनाच्या वतीने जे. जे. रुग्णालयाचे पथक देखील आझाद मैदान परिसरात नेमण्यात आले आहे.


६) १०८ रुग्णवाहिका सेवेच्या एकूण तीन रुग्णवाहिका आंदोलनस्थळी उपलब्ध आहेत.


७) आंदोलकांकरिता प्रसाधनगृहांची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. नियमित तसेच फिरती अशी दोन्ही प्रकारची प्रसाधनगृहे मिळून सुमारे ३०० पेक्षा अधिक शौचकूपे होतील, इतकी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये, आझाद मैदान व परिसरातील “पैसे द्या आणि वापरा” या तत्त्वावरील तसेच इतर सर्व सार्वजनिक शौचालये आंदोलकांच्या वापरासाठी मोफत उपलब्ध केली आहेत. मैदानात आतील बाजूस एकूण २९ शौचकूप असणारे शौचालय विनामूल्य उपलब्ध केले आहे. आझाद मैदानास लागून असलेल्या महात्मा गांधी मार्गावर प्रत्येकी १० शौचकुपे असलेली ३ फिरती शौचालये उपलब्ध केली आहेत. मेट्रो साइट शेजारी १२ फिरती (पोर्टेबल) शौचालये उपलब्ध केली आहेत. तसेच, अतिरिक्त शौचालयांची सोय केली आहे. तर, फॅशन स्ट्रीट आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर मिळून २५० शौचकूपे असणारी फिरती शौचालये विनामूल्य वापरासाठी पुरवली आहेत.


८) पावसाळी परिस्थिती पाहता आझाद मैदान परिसरात कीटकनाशक धूम्रफवारणी सातत्याने केली जात आहे. त्यासाठी स्वतंत्र २ पथके कार्यरत आहेत.


९) इतर आवश्यक सेवा सुविधा पुरवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'ए' विभाग कार्यालयासह स्थानिक इतर अधिकाऱ्यांकडून आंदोलन परिसरात सातत्याने पाहणी आणि देखरेख करण्यात येत आहे. नजीकच्या इतर विभाग कार्यालयांमधून (वॉर्ड) अतिरिक्त अधिकारी, कर्मचारी, कामगार यांची नेमणूक आंदोलन परिसरासाठी करण्यात आली आहे.


१०) आंदोलन कार्यकर्त्यांकरीता राखीव वाहनतळावर महानगरपालिकेच्या ई विभागातर्फेटँकर उपलब्ध करुन देत पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


११) दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने आझाद मैदान आणि परिसरातील कोणतीही उपाहारगृहे अथवा खाद्यपदार्थांची दुकाने बंद केलेली नाहीत, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा रोखलेला नाही. सर्व दुकाने सुरु आहेत. जनमानसात कोणताही गैरसमज पसरु नये, यासाठी हे स्पष्ट करण्यात येत आहे.


Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत