भिवंडी (प्रतिनिधी) : वाहतूक कोंडीचे विघ्न बाप्पांच्या मार्गातही येत आहे. वाहतूक कोंडीचा त्रास ठाणे जिल्ह्यातील सर्वसामान्यांसह गणेशमूर्ती आगमण मिरवणूकीवरही दिसून येत आहे. भिवंडी तालुक्याच्या सीमेवर राहणाऱ्या गावकऱ्यांनी त्यांच्या गणेशमूर्ती बोटीतून घरी आणल्या आहेत. वाहतुक कोंडी आणि खराब रस्ते या दोन प्रमुख कारणांमुळे हा निर्णय घेतल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. ठाणे, भिवंडी, कल्याण शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून नागरिक बेजार झाले आहे. या भागातून अवजड वाहनांच्या वाहतूकीमुळे कोंडीत भर पडते.
भिवंडी तालुक्यातून ठाणे, कल्याणला कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना वेळेत कामावर पोहचणे कठीण झाले आहे. शालेय विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसत आहे. भिवंडीतील अनेक गणेशमूर्ती मिरवणूका वाहतुक कोंडीत अडकल्या होत्या. त्यामुळे तालुक्यातील सीमेवरील नांदकर, ईताडे आणि सांगे या गावातील सुमारे ७० ते ७५ घरगुती गणपतींचा प्रवास बोटीतून झाला. दरवर्षी कल्याण, गंधारी, बापगाव ते नांदकर या मार्गे गावात मिरवणूका काढत गणेशमूर्ती आणल्या जातात. भिवंडी तालुक्यातील नागरिकांवर यावर्षी चक्क काळू नदीतून बोटीद्वारे गणेशमूर्ती आणण्याची वेळ आली. ''भिवंडी तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्डे आणि कोंडी टाळण्यासाठी आम्ही गणेशमूर्ती प्रवासी बोटीने आणण्याचे ठरविले होते. त्यानुसार गावातील गणेशमूर्ती बोटीने आणल्या'' अशी माहिती मनोज पाटील, माजी उपसरपंच, नांदकर यांनी दिली.