अमरावती: हिंदूच्या सणाला विघ्न नको, जरांगे पाटलांनी न्यायालयाच्या आदेशाचं पालन केले पाहिजे,' अशी प्रतिक्रिया अमरावतीमधील भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे. मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई लढण्यासाठी आज मनोज जरांगे पाटील यांनी जालनामधून मुबंईच्या दिशेने कूच केली आहे. दरम्यान राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतानाच, जरांगे पाटलांनी मुंबईच्या दिशेने रवाना होण्याची योजना आखली आहे, ज्याचा परिणाम गणेशोत्सवावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय या काळांत मुंबईत लाखोंच्या संख्येने भाविक गणपती पाहायला येतात, अशावेळी जरांगे पाटलांचि फौज मुंबईत धडकणार असल्याने प्रशासनाचे देखील काम वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर, जरांगे पाटील यांनी गणेशोत्सवानंतर आंदोलनाला सुरुवात करावी, असा सल्ला नवनीत राणा यांनी दिला आहे.
काय म्हणाल्या नवनीत राणा?
नवनीत राणा यांनी आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या जरांगे पाटील भूमिकेवर प्रतिक्रिया देताना आपले मत मांडताना म्हंटले की, "न्यायालयावर सर्वांचा विश्वास आहे. न्यायालयाच्या आदेशाचं पालन सर्वांनी केलं पाहिजे. गणेशोत्सव हिंदूंचा मोठा सण आहे. महाराष्ट्रात खूप उत्साहाचं वातावरण असून, तो महाराष्ट्रात अतिशय भक्तीभावानं सर्वत्र साजरा केला जात आहे. मुंबईमध्ये पूर्ण देशाचे लोक लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येतात. या ठिकाणी खूप गर्दी उत्साह असतो. त्यामुळे हे ११ दिवस सोडून, परत आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर येऊ शकता."