मुंबई : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यामुळे हवामान विभागाने राज्यातील काही भागांमध्ये पुढील २४ तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत घेतलेल्या आढाव्यानंतर ही सूचना दिली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाट, नंदुरबार, धुळे, जळगाव, नांदेड, हिंगोली, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने NDRF (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) व SDRF (राज्य आपत्ती प्रतिसाद दल) यांना अलर्टवर ठेवले आहे. सध्या राज्यात १८ NDRF पथके आणि ६ SDRF पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत. मुंबईत २ NDRF पथके नेहमीसाठी तैनात असून, आणखी ३ पथके मान्सूनसाठी सज्ज आहेत. याशिवाय पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, कराड, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नागपूर आणि पुणे येथेही पथके तैनात आहेत. SDRF चे पथक नागपूर, गडचिरोली, धुळे आणि नांदेड येथे सक्रिय आहेत.
गेल्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद रायगड जिल्ह्यात ३४. ७ मिमी झाली आहे. त्यानंतर पालघरमध्ये ३०. ३० मिमी, ठाण्यात ३० मिमी, नंदुरबारमध्ये २७. १ मिमी आणि रत्नागिरीत १७. ५ मिमी पाऊस झाला आहे.
मुंबई उपनगरात या पावसामुळे भिंत कोसळल्याची घटना घडली असून, एक व्यक्ती जखमी झाला आहे. आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाचा नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत आहे. हवामान विभाग (IMD) आणि राष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्था (NRSC) यांच्याकडून सतत माहिती घेतली जात असून, ती संबंधित जिल्ह्यांना पाठवली जात आहे.