रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावात दाखल झाले आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानक आणि एस. टी. बस स्थानकावर प्रचंड गर्दी दिसत आहे.
मुंबईसह इतर महानगरांतून मोठ्या प्रमाणात बसेस मोफत तसेच सशुल्क सोडण्यात आल्यामुळे चाकरमानी दोन दिवस आधीच गावाकडे दाखल झाले आहेत. परिणामी रविवारपासूनच बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दीचे दृश्य दिसत आहे.
बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसत असून, गणपती मखरासाठी लागणारे साहित्य, सजावटीचे सामान, फुले, फराळाचे पदार्थ यांची खरेदी सुरू आहे. दुकानदारांनीही विविध वस्तूंचा साठा ठेवून तयारी केली आहे. त्यामुळे परिसरात एक वेगळाच उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.