बीड : गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद आणि दगडफेक झाली. हा वाद लक्ष्मण हाके यांनी बीडमध्ये ओबीसी समाजाच्या बैठकीत विजयसिंह पंडितांविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे पेटला होता.
ही घटना मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या विधानांमुळे पेटली होती. बीडमध्ये ओबीसी समाजाच्या बैठकीत लक्ष्मण हाके यांनी विजयसिंह पंडित यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. हाकेंच्या म्हणण्यानुसार, “ओबीसींच्या दारात आले तर दंडुके हातात घेऊ,” असे त्यांनी सांगितले. या विधानाने पंडित समर्थकांमध्ये संताप निर्माण केला आणि गेवराई शहरात त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. आंदोलकांनी पुतळ्यावर आग लावली आणि जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
यावेळी, मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंडितांच्या समर्थकांनी शहरात बॅनर लावले होते. यावरून हाके यांनी वादग्रस्त विधान केले आणि पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. हाके गेवराईत पोहोचल्यानंतर दोन्ही गटांमध्ये चप्पल भिरकाव, दगडफेक आणि जोरदार घोषणाबाजी झाली. हाकेंच्या गाडीची पुढील काच फुटल्याचे दिसून आले.
हाके यांनी पत्रकारांशी बोलताना विजयसिंह पंडित यांना थेट आव्हान दिले, ‘कुणाच्याही दहशतीखाली राहणारे आम्ही नाही आहोत. गावगाड्यामध्ये राहणारे आम्ही आहोत. बास झालं तुमचं शोषण, तुमचा माणूस मुख्यमंत्र्यांना शिव्या देतो. आम्ही सुद्धा मर्दाची औलाद आहे. तुझ्या गावात आलो आहेत 500 किलोमीटर अंतरावरून. दम असेल तर बाहेर ये’ असं आव्हान आमदार विजयसिंह पंडित यांना दिलं आहे.
विजयसिंह पंडित यांनी हाकेंवर टीका करत सांगितले, ‘लक्ष्मण हाके हा श्वान आहे. त्यावर जास्त मी बोलणार नाही आणि हा अदखलपात्र माणूस आहे. आमच्या मतदार संघातील लोकांनी या लक्ष्मण हाके नावाच्या श्वानाला ओळखलं आहे. याने या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात प्रचार केला होता. त्याने ज्या उमेदवाराचा प्रचार केला त्याचं डिपॉझिट जप्त झालं आहे. हा दलाल श्वान आहे आणि हा स्ट्रीट डॉग आहे आणि हा रिचार्जवाला डॉग आहे. त्यामुळे आम्हाला सगळं माहीत हा कोणाच्या बोलण्यावरून भुंकतो आहे, ते आणि त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत’ असं विधान केलं होतं.
घटनास्थळी पोलिसांनी दोन्ही गटांना समजावून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. हाके यांना पोलिसांच्या संरक्षणाखाली चौकातून बाहेर काढून बीडकडे रवाना करण्यात आले. गेवराईतही सुरक्षा वाढवण्यात आली असून, दोन्ही गट आक्रमक असल्याने पोलिस सतर्क आहेत.