नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत राजस्थानमधील जोधपूर येथे आयोजित केली जाणार आहे. संघ व संघाशी संबंधित वैचारिक संस्थांमध्ये समन्वय साधण्यासाठी ही बैठक दरवर्षी आयोजित केली जाते.
मागील वर्षी ही बैठक केरळमधील पालक्काड येथे झाली होती. या बैठकीत भाजप, विश्व हिंदू परिषद, भारतीय मजदूर संघ, राष्ट्र सेविका समिती, वनवासी कल्याण आश्रम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय किसान संघ, विद्या भारती यांसह संघ प्रेरित ३२ संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष, संघटनमंत्री व प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, तसेच सर्व सह सरकार्यवाह व अन्य वरिष्ठ पदाधिकारी यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे. संघाच्या अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,या बैठकीत सहभागी संघटना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनुभवांच्या आधारे विविध घडामोडींचे मूल्यांकन सादर करतात.