जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. फरीद हुसैन असे मयत पावलेल्या स्थानिक क्रिकेटपट्टूचे नाव आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील स्थानिक क्रिकेटर फरीद हुसेन याचा २० ऑगस्ट रोजी झालेल्या रस्ते अपघातात मृत्यू झाला. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या घटनेत फरीद दुचाकीवरून जात असताना एका कारचं दार अचानक उघडलं आणि ते थेट कारच्या दाराला धडकले. अपघात इतका भीषण होता की जमिनीवर कोसळताच ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
कोण होता फरीद हुसैन?
क्रिकेटची आवड असलेल्या फरीद हुसैनला त्याच्या प्रतिभेमुळे उदयोन्मुख खेळाडू म्हणून पाहिलं जात होतं. जम्मू-काश्मीरच्या स्थानिक क्रिकेट सामन्यांमध्ये फरीद हुसैन खेळायचा. जम्मू-काश्मीरच्या क्रिकेट वर्तुळातही त्याने नाव कमावलं होतं. फरीदच्या अकाली निधनामुळे त्याचे सहकारी, खेळाडू आणि चाहत्यांमध्ये शोक पसरला आहे. मेहनती आणि प्रतिभावान खेळाडू असलेल्या फरीद हुसैन याची कारकीर्द नुकतीच आकार घेऊ लागली होती, पण तेव्हाच घात झाला असल्याच्या प्रतिक्रिया फरीदच्या सहकाऱ्यांनी दिल्या आहेत.