मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित टोल टॅक्स एजन्सीचा करार रद्द करण्यात आला आहे. तसेच त्यांना २० लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. नेमके काय आहे हे प्रकरण? आणि कुठे घडली ही घटना? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
मेरठ-करनाल विभागातील (NH-७०९A) भुनी टोल प्लाझा येथे तैनात असलेल्या टोल कर्मचाऱ्यांनी लष्करी जवानासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) मोठी कारवाई केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, ज्या जवानाशी टोल कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तन करण्यात आले तो ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी होता. त्यामुळेच ही धडक कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी घडलेल्या या घटनेनंतर, NHAI ने टोल संकलन एजन्सीचा करार रद्द केला आहे. यासोबतच, एका वर्षासाठी कोणत्याही प्रकारची नवीन बोली लावण्यात सहभागी होण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
इतकेच नव्हे, NHAI ने टोल एजन्सीला २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे आणि त्यांची ५ लाख रुपयांची कामगिरी सुरक्षा देखील जप्त केली आहे. याशिवाय, भुनी टोल प्लाझावरील नुकसान झालेले साहित्य आणि संरचनेच्या दुरुस्ती तसेच बदलीसाठी संबंधित एजन्सीला तब्बल ३.६६ कोटी रुपये द्यावे लागणार आहे.
या घटनेबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी टोल एजन्सी मेसर्स धरम सिंग यांवर 'कारणे दाखवा नोटीस' बजावण्यात आली होती, परंतु त्यांचे उत्तर असमाधानकारक आढळले. चौकशीत, एजन्सीला कराराच्या अटींचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी धरण्यात आले. ज्यामध्ये गैरवर्तन, हल्ला, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि टोल कर्मचाऱ्यांकडून शुल्क वसूल करण्यात समस्या या गोष्टींचा समावेश होता.
नेमके काय घडले होते?
मेरठच्या भुनी टोल प्लाझावर ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या जवानाला टोल कर्मचाऱ्यांनी खांबाला बांधून मारहाण केली होती. ही घटना अत्यंत निंदनीय आणि खळबळ माजवणारी ठरली. सदर प्रकरण उघडकीस आल्यानंतर मेरठ पोलिस सक्रिय झाले. आणि त्यांनी मारहाण करणाऱ्या एकूण ६ आरोपींना ताब्यात घेतले.
या संदर्भात माहिती देताना, एसएसपी डॉ. विपिन ताडा म्हणाले की, या घटनेशी संबंधित सहा आरोपी, सचिन, विजय, अनुज, अंकित, सुरेश राणा आणि अंकित शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी टोल प्लाझाचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले होते. पीडित जवान कपिल हा लष्करात आहे आणि श्रीनगरमध्ये तैनात आहे. तो ऑपरेशन सिंदूरमध्येही सहभागी होता. रजा संपल्यानंतर तो दिल्ली विमानतळावरून विमान पकडून ड्युटीवर परतत असताना ही घटना त्याच्यासोबत घडली.
टोल एजन्सींना एनएचएआयच्या सूचना
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी, एनएचएआयने सर्व टोल एजन्सींना कडक निर्देश जाहीर केले आहे. ज्यामध्ये प्रवाशांशी चांगले वर्तन करण्यासाठी टोल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. एनएचएआयने सर्व टोल प्लाझा कर्मचाऱ्यांसाठी 'टोल प्लाझावर ग्राहकांशी संवाद आणि संवाद कौशल्य वाढवणे' या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रमही आयोजित केला होता. एनएचएआयने राष्ट्रीय महामार्गांवर लोकांना सुखकर आणि अडथळामुक्त प्रवासाचा अनुभव देणे हे त्यांचे प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले आहे. टोल प्लाझा कर्मचाऱ्यांकडून महामार्ग वापरणाऱ्यांशी असभ्य वर्तन कोणत्याही परिस्थितीत स्वीकार्य असणार नाही आणि अशा घटनांवर कठोर कारवाई केली जाईल अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे.