नात्यांच्या पारंपरिक चौकटींनी साकारलेला आणि एक नव्या विचारांची झलक देणारा ‘बिन लग्नाची गोष्ट' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा हा टीझर लिव्ह-इन रिलेशनशिपसारख्या आधुनिक संकल्पनेवर आधारित असून, हा चित्रपट नात्यांची नवीन व्याख्या मनोरंजनात्मकरित्या मांडतो. नात्यांचा गुंता, प्रेमाची गोडी आणि थोडीशी नोकझोक… हे सगळं सांगणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट येत्या १२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ, गिरीश ओक, सुकन्या मोने आणि संजय मोने यांच्या दमदार अभिनयाने सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नात्यांची नवी सफर ठरणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य इंगळे, मुख्य कलाकार उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी दै. प्रहारचे तेजस बोरघरे यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या.
‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणाले की, "एकदा प्रिया-उमेशच्या घरी गेलो असता त्यांच्या वागण्यातली नैसर्गिकता, संवादातील सहजता बघून वाटलं, ही कथा त्यांच्याशिवाय कोण करणार? त्यांनाही ही कल्पना आवडली आणि त्यांनीही होकार दिला. तसेच निवेदिता ताई आणि गिरीश सरांची जोडी प्रेक्षकांना याआधीही आवडली आहे. त्यामुळे ही चौकडी एकदम परफेक्ट होती. हा चित्रपट फक्त नात्यांवर भाष्य करणारा नसून तो प्रत्येक प्रेक्षकाला स्वतःच्या आयुष्याशी जोडणारा आहे. नातं टिकवण्यासाठी परस्परांवरील विश्वास, मोकळेपणा आणि जिव्हाळा हाच खरा पाया आहे. या कथेत प्रेक्षकांना हे सगळं अनुभवता येईल.''
प्रत्येक नातं म्हटलं की एखादा विचार परिस्थिती मांडण्यासाठी काही गोष्टी दोघांमध्ये सारख्या असाव्या लागतात. कधीकधी एखाद्या चित्रपटातील पात्र साकारणं आणि ती जगणं हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. चित्रपटातील केलेल्या पात्रांनी प्रत्येकवेळी आयुष्याची शिकवण द्यायलाच पाहिजे असे काही नाही. आपण मनोरंजन क्षेत्रामध्ये असल्यामुळे पात्रांच्या प्रवाहातून प्रेक्षकांना चांगला संदेश कसा देता येईल हे खूप महत्त्वाचे असते. तसेच या चित्रपटामध्ये निवेदिता सराफ आणि गिरीश ओक ही जोडी काही सांगू पाहतायत यावरून असे वाटतं की प्रत्येकाचे आई-वडील आपल्या मुलांच्या हितासाठी काही गोष्टी सांगत असतात. त्यामुळे काळानुसार आई-वडिलांनी सांगितलेल्या त्या गोष्टी आपण कशाप्रकारे समजून घेतल्या पाहिजेत याची जाणीव या चित्रपटातून होते.
या चित्रपटाचे भारताबाहेर चित्रीकरण झाल्यामुळे प्रत्येकालाच वेळेचे नियोजन आखून दिलेले असते. त्या वेळेतच प्रत्येक कलाकाराला ते शूटिंग संपवायचे असते. यासाठी दिग्दर्शकाच्या डोक्यात जर चित्रपटाबद्दल भन्नाट कल्पना असतील तर त्या कल्पना कलाकाराला समजवायला सोप्या पडतात आणि त्या कल्पना जर कलाकाराला समजल्या की कलाकाराला त्या चित्रपटातील प्रत्येक पात्र साकारण सोपं जातं. ‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य इंगळे हे सॉर्टेड दिग्दर्शक असल्यामुळे त्यांना जे माहिती आहे तेच कलांकारांना सांगण्याचा प्रयत्न करतात आणि तसे ते कलाकारांकडून करून घेतात. यामध्ये भावना, वाक्य, संवाद यावर मुख्यत: भर देणारा हा दिग्दर्शक असल्याचे उमेश कामत याने सांगितले. चित्रपटाबद्दल सांगताना उमेश आणि प्रिया म्हणतात की, आपल्या खऱ्या आयुष्यात अनेक चढउतार येत असतात. आपलं खरं आयुष्य साध्या सरळ पद्धतीने चालू असले तरी आयुष्यात अनेक बऱ्या वाईट गोष्टी घडल्यामुळे जीवनातील प्रत्येक वळणावर काही बदलत्या गोष्टींना आपल्याला सामोरे जावे लागते. या चित्रपटाचा ठरवून केलेला स्क्रीन प्ले असा आहे की, या चित्रपटात आताच्या पिढीला अनुसरून हा विषय मांडण्यात आला आहे. यामध्ये कुठेच कंटाळवाणा प्रयोग वाटत नाही. प्रत्येक भूमिकेमधून आपल्याला काही तरी शिकायला मिळते. या सिनेमामध्ये अनेक अचंबित करणारे प्रसंग आहेत. त्यातून गोष्ट वेगळ्या दिशेकडे जाते पण अनेक चांगले विचार मांडून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या चित्रपटातून केले आहे. बिन लग्नाची गोष्ट या चित्रपटाच्या नावावरून कितीही कुतूहल किंवा प्रश्न पडत असले तरी हा चित्रपट सहकुटुंब बघण्याचा चित्रपट आहे. कुठल्याही टोकाची भूमिका नसलेला, मनोरंजन करणारा, भावनात्मक करणारा, हसवणारा, खिळवून ठेवणारा, पुन्हा प्रेमात पाडणारा आणि नात्याची गुंफन जोडणारा हा चित्रपट आहे तो तुम्ही नक्कीच बघा.