छत्तीसगड : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या (Naxalite Attack) अमानुष कृत्यामुळे पुन्हा एकदा भीती आणि संतापाची लाट उसळली आहे. कांकेर जिल्ह्यातील बिनागुंडा गावात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय ध्वज फडकावल्यामुळे मुनेश नूरूटी या तरुणाची निर्दय हत्या करण्यात आली. देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि देशभक्तीचे वातावरण अनुभवले जात असताना, या दुर्दैवी घटनेने बस्तर विभागातील नक्षलवाद्यांच्या क्रौर्याला आणखी अधोरेखित केले आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, मुनेश नूरूटीने आपल्या गावात अभिमानाने राष्ट्रीय ध्वज फडकावला होता. ही घटना नक्षलवाद्यांना न जुमानता, देशप्रेमाची जाणीव दर्शविणारी ठरली. मात्र त्याच्या या धाडसाची किंमत त्याला प्राण गमावून चुकवावी लागली. नक्षलवाद्यांनी त्याला लक्ष्य करून हत्या केली आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून राज्य प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांसाठी हा गंभीर इशारा मानला जात आहे. स्वातंत्र्य दिनी राष्ट्रीय ध्वज फडकावणे ही प्रत्येक भारतीयाची शान असताना, अशा कृत्याला जीव घेण्याइतका विरोध करणे हे नक्षलवाद्यांच्या निर्दयी आणि अमानुष चेहऱ्याचे प्रतीक असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा नक्षलवाद्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
मुंबई : महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला यंदापासून अधिकृतपणे “राज्य महोत्सव” म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख मानला जाणारा हा ...
बारावी उत्तीर्ण, गावातील मोजक्या शिक्षित तरुणाचा अंत
छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील बिनागुंडा गावातील बारावी उत्तीर्ण मुनेश नूरूटी हा गावातील मोजक्या शिक्षित तरुणांपैकी एक होता. आपल्या शिक्षणामुळे आणि जागरूकतेमुळे तो गावकऱ्यांमध्ये वेगळा ठरत होता. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने, १५ ऑगस्ट रोजी त्याने एक ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय घेतला. नक्षलवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक असलेल्या गावातील नक्षल स्मारकावरच त्याने भारताचा राष्ट्रीय ध्वज फडकावला. या धाडसी कृतीचा व्हिडिओ काढण्यात आला आणि तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. देशप्रेमाची ही घटना जशी लोकांपर्यंत पोहोचली, तशीच ती नक्षलवाद्यांच्या नजरेतही भरली. नक्षलवाद्यांसाठी ही कृती त्यांच्या अस्तित्वाला दिलेले आव्हान होती. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी नक्षलवाद्यांची एक तुकडी गावात दाखल झाली. गावकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी तथाकथित "जन अदालत" भरवली. या खोट्या न्यायालयात मुनेशला राष्ट्रीय ध्वज फडकवल्याबद्दल आणि पोलिसांचा मुखबीर असल्याचा खोटा आरोप लावत दोषी ठरविण्यात आले. गावकऱ्यांसमोरच नक्षलवाद्यांनी त्याला मृत्युदंड सुनावला. त्यानंतर निर्दयी पद्धतीने त्याचा गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकावणाऱ्या मुनेशच्या या बलिदानामुळे गावभर हळहळ व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय ध्वज फडकवल्यामुळे मुनेशची हत्या
राष्ट्रीय ध्वज फडकवल्यामुळे त्याचा जीव घेतला गेला असावा, असा संशय व्यक्त होत असताना, कुटुंबीयांनी नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे या घटनेची तक्रार पोलिसांकडे करण्याचे धाडस केले नाही. त्यांनी शांतपणे मुनेशचे अंत्यसंस्कार केले. १७ ऑगस्ट रोजी नक्षलवाद्यांनी गावाजवळ एक बॅनर लावून या हत्येची जबाबदारी स्वीकारली. त्या बॅनरमध्ये मुनेशला पोलिसांचा मुखबीर असल्याचा आरोप करत ‘गद्दार’ ठरविण्यात आले. या बॅनरमुळे गावकऱ्यांमध्ये अधिकच भीती पसरली. दरम्यान, या घटनेची पोलिसांनी नोंद घेतली असून अधिकृत तपास सुरू करण्यात आला आहे. १५ ऑगस्ट रोजी मुनेशने नक्षल स्मारकावर अभिमानाने राष्ट्रीय ध्वज फडकावल्याचा व्हिडिओही पोलिसांच्या हाती लागला आहे. यामुळे राष्ट्रीय ध्वज फडकवल्यामुळेच मुनेशची हत्या झाली असावी का, या दृष्टिकोनातून तपास सुरू असल्याची माहिती कांकेरचे पोलीस अधीक्षक कल्याण एलीसेला यांनी दिली. स्वातंत्र्यदिनानिमित्त संपूर्ण देशात प्रत्येक नागरिक तिरंगा अभिमानाने फडकावत होता. मात्र त्याच भारतात, बस्तर क्षेत्रातील मागास भागात नक्षलवाद्यांनी कायदा आणि संविधानाची पायमल्ली करत एका तरुणाचा जीव घेतला. हा प्रसंग केवळ दुर्दैवीच नाही, तर लोकशाहीला काळिमा फासणारा आणि संपूर्ण देशासाठी लाजिरवाणा ठरत असल्याचे मानले जात आहे.