ISRO News : गगनयान अंतराळात झेपावणार, ISRO कडून तारीख जाहीर, काय आहे नवीन अपडेट?

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने गुरुवारी देशवासीयांसाठी एक मोठी आनंदवार्ता दिली आहे. भारताच्या पहिल्या मानवयुक्त अंतराळ मोहिमेच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकत, गगनयान-जी१ मोहिमेचे प्रक्षेपण यावर्षी डिसेंबर महिन्यात होणार असल्याची माहिती ISRO चे प्रमुख व्ही. नारायणन यांनी दिली. दिल्ली येथे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, तसेच मोहिमेसाठी निवडले गेलेले ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आणि प्रशांत बालकृष्णन नायर यांच्या उपस्थितीत नारायणन यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी गगनयान प्रकल्पाशी संबंधित महत्वाचे तपशील मांडले. नारायणन यांनी स्पष्ट केले की, डिसेंबरमध्ये होणारी ही पहिली मानवरहित मोहीम असेल. या मोहिमेद्वारे विविध प्रणालींची चाचणी घेण्यात येणार असून, त्यानंतर मानवयुक्त उड्डाणासाठीची तयारी अधिक वेगाने केली जाईल. गगनयान प्रकल्प हे भारतासाठी केवळ अंतराळ मोहिमेचे ध्येय नसून, देशाच्या अंतराळ संशोधन क्षमतेतील एक नवा टप्पा ठरेल. या मोहिमेमुळे भारत हे जगातील निवडक त्या देशांच्या यादीत सामील होईल, ज्यांनी मानवाला स्वतःच्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अंतराळात पाठवले आहे.


ISRO प्रमुख नारायणन यांनी सांगितले की, गेल्या चार महिन्यांत भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण कामगिरी करण्यात आल्या असून, विविध प्रयोग यशस्वीरीत्या पार पडले आहेत. या यशामुळे गगनयान प्रकल्पाची तयारी अधिक वेगवान झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे पहिले मानवविरहित अंतराळ मिशन गगनयान-जी1 यावर्षी डिसेंबरच्या सुमारास प्रक्षेपित केले जाणार आहे. या मोहिमेत खास आकर्षण ठरणार आहे ‘व्योममित्रा’ मानवासारखी दिसणारी महिला रोबोट. व्योममित्रा अंतराळात जाऊन विविध चाचण्या घेणार असून, मानवी अंतराळवीरांच्या मोहिमेपूर्वी महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध करून देणार आहे. नारायणन यांनी सांगितले की, या मोहिमेचे यश हे भारताच्या पहिल्या मानवयुक्त गगनयान मोहिमेसाठी मजबूत पायाभूत पाऊल ठरेल.



ISS मिशनचा अनुभव गगनयानसाठी ठरणार मोलाचा


भारताच्या गगनयान मोहिमेसाठी निवडले गेलेले ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी आपला अनुभव शेअर करताना सांगितले की, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) मिळालेला प्रत्यक्ष अनुभव हा भारताच्या आगामी अंतराळ मोहिमांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. शुक्ला नुकतेच यशस्वी अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेत सहभागी झाले होते. त्या मोहिमेतून परत आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ISS वरील प्रशिक्षण आणि कामकाजाची पद्धत गगनयान प्रकल्पासाठी तसेच भविष्यात भारताने उभारायच्या स्वतःच्या अंतराळ स्थानकासाठी अमूल्य ठरेल. ते पुढे म्हणाले, “आम्ही लवकरच आपल्या स्वतःच्या कॅप्सूलमधून, आपल्या रॉकेटचा वापर करून, पृथ्वीवरून एखाद्या भारतीयाला अंतराळात पाठवणार आहोत.” या मोहिमेसाठी योगदान देणाऱ्या वैज्ञानिकांचे, सरकारचे आणि ISRO चे त्यांनी विशेष आभार मानले. शुक्ला यांनी स्पष्ट केले की, गगनयान प्रकल्प हा केवळ एक अंतराळ मोहीम नसून संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. “ही मोहीम म्हणजे एका व्यक्तीची नाही, तर १४० कोटी भारतीयांची स्वप्ने साकार करण्याचा प्रयत्न आहे,” असे ते म्हणाले.





काय आहे गगनयान मोहीम?


गगनयान मोहीम ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ची आतापर्यंतची सर्वात महत्त्वाकांक्षी आणि ऐतिहासिक मोहीम मानली जात आहे. या मोहिमेद्वारे भारत पहिल्यांदाच मानवाला अंतराळात पाठवणार आहे. त्यामुळे भारत अंतराळ संशोधन क्षेत्रात त्या मोजक्या देशांच्या यादीत सामील होईल, ज्यांनी स्वतःच्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मानवाला पृथ्वीबाहेर पाठवले आहे. या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश म्हणजे मानवाला पृथ्वीच्या समतल कक्षेत सुरक्षितपणे पोहोचवणे, त्याचे काही काळ वास्तव्य घडवून आणणे आणि नंतर त्याला सुरक्षितपणे पुन्हा पृथ्वीवर परत आणणे. गगनयानद्वारे केवळ अंतराळवीरांना अंतराळात पाठवणे एवढेच ध्येय नाही, तर त्यातून भारताची तांत्रिक क्षमता, स्वावलंबन आणि अंतराळातील नेतृत्वाची नवी दिशा जगासमोर मांडणे हा देखील उद्देश आहे. सुरक्षित मानवरहित व मानवयुक्त मोहिमा पार पाडण्याची क्षमता दाखवणे, तसेच भविष्यातील भारतीय अंतराळ स्थानकासाठी पायाभूत तयारी करणे हे या योजनेचे महत्त्वाचे अंग आहे. गगनयान प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर भारताचा शिरपेच अंतराळ क्षेत्रात अधिक उंचावणार असून, ही मोहीम देशासाठी “स्पेस ड्रीम्स टू स्पेस रियलिटी” असा मैलाचा दगड ठरणार आहे.



‘व्योममित्र’ यंदाच घेणार अंतराळ झेप


भारतातील बहुचर्चित गगनयान प्रकल्पाचा पहिला टप्पा यंदाच सुरू होणार आहे. डिसेंबर २०२५ मध्ये गगनयानची पहिली मानवरहित मोहीम प्रक्षेपित केली जाणार असून, त्यात ‘व्योममित्र’ हा अर्धमानव स्वरूपाचा रोबोट अंतराळात पाठवला जाणार आहे. व्योममित्र मानवासारखा संवाद साधू शकतो आणि अंतराळवीरांसाठी आवश्यक असणाऱ्या परिस्थितीची अचूक चाचणी घेऊ शकतो. त्यामुळे गगनयान मोहिमेतील हा प्रयोग अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या पहिल्या मानवरहित उड्डाणानंतर आणखी दोन मानवरहित मोहिमा राबवल्या जातील. या चाचण्यांमधून अंतराळातील मानवसदृश परिस्थितीत अंतराळयानातील यंत्रणा, प्रणाली आणि सुरक्षेची कार्यक्षमता तपासली जाईल. यशस्वी मानवरहित मोहिमांनंतर गगनयानाचा सर्वात मोठा टप्पा पूर्ण होणार आहे. २०२७ मध्ये भारतीय अंतराळवीर प्रत्यक्ष अंतराळात झेपावतील आणि भारत जगातील निवडक देशांच्या पंक्तीत सामील होईल. गगनयान मोहिमेचा हा प्रवास केवळ अंतराळ तंत्रज्ञानातील नवा अध्याय नसून, तो भारताच्या अंतराळ शक्तीचा जागतिक स्तरावर ठसा उमटवणारा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.



२०२७ मध्ये भारतीय अंतराळवीरांची पहिली झेप


भारताच्या गगनयान मोहिमेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा २०२७ मध्ये पार पडणार आहे. यावेळी पहिल्यांदाच भारतीय अंतराळवीर अंतराळात पाऊल ठेवणार आहेत. या ऐतिहासिक मोहिमेची सुरुवात २०२७ च्या पहिल्या तिमाहीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गगनयान अंतराळयानातून या मोहिमेत तीन भारतीय अंतराळवीरांना एकत्र अंतराळात पाठवण्यात येईल. ही मोहीम किमान ३ दिवस ते जास्तीत जास्त एका आठवड्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे. या कालावधीत अंतराळवीरांना विविध वैज्ञानिक प्रयोग करणे, अंतराळयानातील प्रणालींची कार्यक्षमता तपासणे आणि पृथ्वीच्या कक्षेत सुरक्षित वास्तव्यासाठी आवश्यक अनुभव मिळवणे हे उद्दिष्ट असणार आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारताचा शिरपेच जागतिक अंतराळ संशोधन क्षेत्रात आणखी उंचावणार असून, अमेरिका, रशिया आणि चीननंतर स्वतःच्या क्षमतेने मानवाला अंतराळात पाठवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताची गणना होणार आहे. गगनयान प्रकल्पामुळे भारताच्या अंतराळ संशोधन क्षमतेला एक नवा आयाम मिळेल, तसेच भविष्यातील भारतीय अंतराळ स्थानकाच्या उभारणीसाठी ही पायाभरणी ठरेल.

Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे