मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो "बिग बॉस" चा १९वा सीझन लवकरच सुरू होणार असून, या सीझनमध्ये काही मोठा धमाका होण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार, या शोमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील दोन दिग्गज व्यक्ती, बॉक्सिंग लीजेंड माईक टायसन आणि WWE सुपरस्टार द अंडरटेकर, हे वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
"बिग बॉस" च्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्टार्सची एन्ट्री होणार असल्याने, प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. रिपोर्टनुसार, माईक टायसन ऑक्टोबर महिन्यात काही दिवसांसाठी खास पाहुणा म्हणून घरात येईल. तर, 'डेडमॅन' नावाने ओळखला जाणारा द अंडरटेकर नोव्हेंबर महिन्यात वाईल्ड कार्ड एंट्री घेईल.
या दोन्ही स्टार्सच्या एन्ट्रीची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. विशेषतः, WWE आणि सलमान खानच्या चाहत्यांना 'अंडरटेकर'ला 'बिग बॉस' च्या घरात पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. काही रिपोर्ट्सनुसार, द अंडरटेकरला 'बिग बॉस' च्या इतिहासातील सर्वात जास्त मानधन दिले जाणार आहे. यापूर्वी द ग्रेट खली 'बिग बॉस ४' मध्ये सहभागी झाला होता आणि त्याला एका आठवड्यासाठी ५० लाख रुपये मिळाले होते. द अंडरटेकरची फी त्यापेक्षा खूप जास्त असू शकते, असा अंदाज आहे.
या सीझनमध्ये बॉलीवूड, टीव्ही आणि सोशल मीडियातील अनेक प्रसिद्ध चेहरे सहभागी होणार आहेत. यामध्ये गौरव खन्ना, अशनूर कौर, अव्हेझ दरबार आणि नगमा मिराजकर यांच्या नावांची चर्चा आहे. "बिग बॉस १९" चा ग्रँड प्रीमियर २४ ऑगस्ट रोजी कलर्स टीव्ही आणि जिओ हॉटस्टारवर होणार असून, नेहमीप्रमाणेच सलमान खान शो होस्ट करणार आहे. मात्र, माईक टायसन आणि अंडरटेकरच्या एन्ट्रीच्या बातमीने या सीझनची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.