गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी ‘शंकराचा बाळ आला’ भक्तिगीत सज्ज रसिकांच्या भेटीला आले आहे. यामध्ये गायिका वैशाली माडे यांच्या सुरेल आवाजात, मंदार चोळकर यांच्या ओजस्वी शब्दरचनेत आणि वरुण लिखाते यांच्या सुंदर संगीतामध्ये सजलेलं हे गीत भक्तीभाव, कुटुंब आणि देशभक्ती यांचा अनोखा संगम आहे. या गाण्यात सैनिक आईची हृदयस्पर्शी कथा मांडली आहे गणेशोत्सवासाठी घरी आलेली ही आई बाप्पाचे पूजन करून पुन्हा देशसेवेसाठी निघते. भक्तीभावासोबत देशभक्तीचा संदेश देणारे हे गीत प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडणार आहे. कलाकार योगिता चव्हाण यांचा भावपूर्ण अभिनय, अभिजीत केळकर यांची ऊर्जा आणि आरव आयेरचा निरागस आनंद हा प्रत्येकाला आपल्या घरच्या गणेशोत्सवाची आठवण करून देतो. दिग्दर्शक पराग सावंत यांच्या दिग्दर्शनात आणि पीसफुल बिट्स प्रॉडक्शन्स निर्मित हे गीत गणेशोत्सवाच्या चैतन्याला नवा स्वर देणार आहे.