Mumbai AC local : "मुंबईकरांना दिलासा; २६८ वातानुकूलीत लोकल गाड्यांना हिरवा कंदील", मंत्रिमंडळात 'या' मोठ्या निर्णयांना मंजुरी

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रचलित प्रवासभाड्यातच वातानुकूलित उपनगरीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी तब्बल २६८ एसी गाड्यांची खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय, उपराजधानी नागपूरमध्ये नवनगर उभारणी आणि नवीन रिंग रोड, पुणे ते लोणावळा या उपनगरीय रेल्वेमार्गावर तिसरी व चौथी मार्गिका, तसेच मुंबईत वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया हा भूमिगत मेट्रो प्रकल्प राबवण्यास हिरवा कंदील देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या सर्व महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली. मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे, नवी मुंबई या महानगरांतील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करून सामान्य प्रवाशांना दिलासा देणे हा सरकारचा उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले.




२६८ आधुनिक वातानुकूलित गाड्यांना मंजुरी


मुंबई उपनगरीय रेल्वेत वाढत्या गर्दीमुळे प्रवासी हैराण झालेले असताना आता सरकारने मोठा दिलासा दिला आहे. दिवा–मुंब्रा परिसरात अलीकडेच झालेल्या अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. दरवाजे स्वयंचलित करण्याच्या घोषणेवर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता राज्य आणि केंद्र सरकारने उपनगरीय मार्गावर वातानुकूलित गाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास योजनेच्या (एमयूटीपी) टप्पा ३ व ३-अंतर्गत तब्बल २६८ नवीन वातानुकूलित गाड्यांची खरेदी करण्यास मंत्रिमंडळ उपसमितीने हिरवा कंदील दिला आहे. या नव्या गाड्या मेट्रोप्रमाणे बंद दरवाज्यांच्या असतील तसेच उच्च दर्जाच्या आधुनिक सुविधा प्रवाशांना मिळणार आहेत. टप्प्याटप्प्याने जुन्या गाड्या हटवून या आधुनिक गाड्या मार्गावर आणल्या जाणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रवासी सध्याच्या भाड्यातच एसी सेवांचा लाभ घेऊ शकणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, केंद्र सरकारची मान्यता मिळाल्यानंतर गाड्यांच्या खरेदीची प्रक्रिया त्वरित सुरू होईल.



"नागपुरात ‘नवनगर’ आणि रिंग रोडला हिरवा कंदील


उपराजधानी नागपूरच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नागपुरात नवीन ‘नवनगर’ उभारण्यास तसेच शहरात रिंग रोड प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे. या रिंग रोडच्या उभारणीमुळे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येणार आहे. तर ‘नवनगर’ प्रकल्पामुळे नागपूरच्या शहरीकरणाला नवा आयाम मिळणार असून शहराचा विकासाचा मार्ग अधिक विस्तारित होणार आहे.



पुणे–लोणावळा मार्गावर तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका


पुणे–लोणावळा या महत्त्वाच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका उभारण्यास मंत्रिमंडळ उपसमितीकडून मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पुणे–लोणावळा कॉरिडॉर अधिक सक्षम होणार असून परिसरातील औद्योगिक, निवासी आणि व्यावसायिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
नवीन मार्गिकेमुळे पुणे शहरातील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी होणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. याशिवाय पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील बालाजीनगर–बिबवेवाडी आणि स्वारगेट–कात्रज या दोन स्थानकांना मंजुरी मिळाल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.



मुंबईत वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो मार्गिका


मुंबईतील मेट्रोचे जाळे आणखी विस्तारत असून, वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान १७.५१ किलोमीटर लांबीच्या भूमिगत मेट्रो मार्गिका-११ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. सुमारे २४ हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात १४ स्थानकांचा समावेश असेल. यातील आणिक आगार हे एकमेव जमिनीवरील स्थानक तर उर्वरित १३ स्थानके भूमिगत असतील. या प्रकल्पाच्या उभारणीची जबाबदारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRCL) कडे असून, जायका (जपानी आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था) यामार्फत निधी उपलब्ध होणार आहे. २०३१ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मार्गिकेमध्ये वडाळा आगार, सीडीएस काॅलनी, गणेश नगर, बीपीटी रुग्णालय, शिवडी, हे बंदर, दारुखाना, भायखळा, नागपाडा, भेंडी बाजार, छत्रपती शिवाजी महाराज स्थानक, हॉर्निमन सर्कल आणि गेटवे ऑफ इंडिया अशी महत्त्वाची भूमिगत स्थानके असतील. या मेट्रो मार्गिकेमुळे मुंबईतील वाहतुकीवरील ताण कमी होऊन दररोज ५.८० लाख प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. याशिवाय बेस्टसोबतच्या संयुक्त विकास प्रकल्पांतर्गत व्यावसायिक कॉम्प्लेक्स उभारला जाणार असून, त्यातून बेस्टला अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल.

Comments
Add Comment

गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल पाडणारच

पूल वाचवणे शक्य नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे पूल वाचवल्यास प्रकल्प खर्च आणि कालावधीही

मुंबई, पुणेकरांनो सावधान! हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

राज्यातील १७ जिल्ह्यांना अतिमुसळधारेचा इशारा तर २० राज्यांना आठवडाभर पाऊस झोडपणार मुंबई (प्रतिनिधी): दोन

मागील २-३ वर्षांत मराठा समाजाला जास्त निधी मिळाला

ओबीसी उपसमितीच्या बैठकीत भुजबळ आक्रमक मुंबई : ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी

मुंबईत अग्निवीरानेच रायफल चोरली, कारण काय? दोघांना तेलंगणात अटक

मुंबई : मुंबईतील नेव्ही नगरमध्ये ड्युटीवर तैनात असलेल्या अग्निवीराची (नेव्ही कर्मचारी) रायफल चोरणाऱ्या दोन फरार

दसरा मेळाव्यासाठी मुंबई मनपाकडून ठाकरे गटाला परवानगी

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी

गोरेगावच्या शालिमार इमारतीत भीषण आग, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई: गोरेगाव येथील एस. व्ही. रोडवरील एका इमारतीला आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ऐन