विरार: वसई-विरारमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, याचा थेट परिणाम पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेवर झाला आहे. नालासोपारा येथे रुळांवर पाणी साचल्यामुळे आणि वसई रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वसई ते विरार दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
सकाळपासून लोकल उशिराने धावत होत्या, पण दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यामुळे ही सेवा पूर्णपणे थांबवण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून ही माहिती देण्यात आली असून, प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
माणगाव : मुंबईकडून माणगावकडे येणा-या मार्गावर माणगाव येथील कळमजे माणगाव ब्रीज कमकुवत झाल्याने १९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता हा पूल वाहतुकीसाठी बंद ...
या मुसळधार पावसामुळे वसई-विरार शहरात अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अंतर्गत वाहतूकही ठप्प झाली असून, रस्ते जलमय झाले आहेत. वसई पूर्वेकडील भोयदापाडा आणि राजावळी येथील चाळींमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक नागरिक अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू करून सुमारे ३० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
हवामान विभागाने पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहावे आणि गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत होण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.