लेह: अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी 'धुरंधर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. लडाखमधील लेह येथे चित्रपटाच्या सेटवर सुमारे १२५ हून अधिक क्रू सदस्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांना तातडीने लेह येथील सजल नर्बू मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
रविवार, १७ ऑगस्ट रोजी लेहच्या गुरुद्वारा पत्थर साहिब परिसरात चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. शूटिंगनंतर क्रूसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे ६०० हून अधिक लोकांनी हे जेवण घेतले. त्यानंतर काही तासांतच अनेकांना पोटदुखी, उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. या घटनेची माहिती मिळताच तातडीने रुग्णवाहिका बोलावून सर्वांना रुग्णालयात हलवण्यात आले.
पोलीस चौकशी सुरू
अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयावरून स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. जेवणाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सुदैवाने, या घटनेत चित्रपटातील मुख्य कलाकारांपैकी कोणालाही त्रास झाल्याचे वृत्त नाही. बहुतांश रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. या घटनेमुळे चित्रपटाच्या शूटिंगला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
चित्रपटाबद्दल...
'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या लोकप्रिय चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर 'धुरंधर'चे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात रणवीर सिंगसोबत संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि अक्षय खन्ना यांसारखे दिग्गज कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.