भारतातील सर्वात प्रसिद्ध जलतरणपटूंपैकी एक असलेल्या बुला चौधरी यांच्या, पश्चिम बंगालच्या हुगली जिल्ह्यातील उत्तरपारा येथील वडिलोपार्जित घरात चोरी झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. ज्यामध्ये चोरट्यांनी ५४ वर्षीय बुला चौधरी यांचे भारतातील चौथ्या क्रमांकाच्या नागरी पुरस्कारासह, २९५ पदके पळवून नेले. ज्याचा प्रचंड धक्का बुला चौधरी यांना बसलेला पहायला मिळालं. या घटनेनंतर चोरीच्या ४८ तासांत, स्थानिक पोलिसांनी त्यांना त्यांची पदके आणि पुरस्कार परत मिळवून दिले आहे. या घटनेच्या संबंधात एका व्यक्तीला अटक देखील करण्यात आली आहे.
चोरी नेमकी कशी झाली?
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या हुगली येथे भारताची प्रसिद्ध जलतरणपटू आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या बुला चौधरी यांच्या वडिलोपार्जित घरी चोरी झाली आहे. चोरांनी घराच्या मागच्या बाजूने कडीकुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि पुरस्कारांसह अनेक घरगुती वस्तूदेखील लंपास केल्या. या दरम्यान घरातील बऱ्याच सामानाचे नुकसान झाले असून या आधीही त्यांच्या घरात तीनवेळा चोरी झाल्याची खबर आहे. सध्या बुला चौधरी त्यांच्या कुटुंबासह कोलकाता येथील कसबा येथे राहतात, आणि वेळोवेळी त्या त्यांच्या हुगली येथील वडिलोपार्जित घरी येत असत.
ज्या घरात चोरी झाली त्यांची देखरेख त्यांचे भाऊ डोलन चौधरी करतात. जे आपल्या आजी-आजोबांसोबत या घरात राहतात. डोलन यांनी सांगितले की, याआधीही तीन वेळा चोरी झालेली असून प्रत्येक वेळी पोलिसांत तक्रार दिल्यानंतरही या घटना वारंवार घडत होत्या. पूर्वी येथे एक पोलीस चौकी होती, मात्र तीही नंतर काढून टाकण्यात आल्यामुळे त्यांचे घर असुरक्षित झाले आहे. घटनेनंतर उत्तरपाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमिताभ सन्याल यांनी घटनास्थळी पाहणी करत थेट कारवाई केली. ज्यामध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात जरी आली असली तरी, ही घटना पुन्हा घडू नये अशी आशा व्यक्त केली जात आहे.
बुला चौधरी कोण आहे?
१९७० मध्ये जन्मलेल्या बुला यांनी वयाच्या नऊ वर्षांच्या असताना पहिल्यांदाच आपला ठसा उमटवला आणि राष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धा जिंकली. इंग्लिश चॅनेल ओलांडून विक्रम करणाऱ्या बुला चौधरी या भारतातील सर्वात लोकप्रिय जलतरणपटूंपैकी एक आहेत. त्यांची कारकीर्द मोठी आणि आव्हानास्पद आहे, जेव्हा देशातील बहुतेक लोक पोहणे हा खेळ म्हणून निवडत नव्हते तेव्हा बुला चौधरी यांनी या खेळाला प्राधान्य दिले. त्या राष्ट्रीय स्तरावरून आंतरराष्ट्रीय जलतरणपटू बनल्या.