टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल
पिंपरी-चिंचवडमध्ये नाटक येत नाही, त्यामुळे नाटक पाहता येत नाही, ही खंत आईने व्यक्त केल्यावर मुलाने नाटक तेथे आणले, हळू हळू एक्झिक्युटिव प्रोड्युसर म्हणून काम पाहिले, नंतर निर्माता होऊन चित्रपट निर्माण केला, अशा या व्यक्तिमत्त्वाचे नाव आहे,
नितीन वैद्य.
नितीनचे शालेय शिक्षण पुण्यातील निगडी प्राधिकरण येथे किर्ती विद्यालयामध्ये झाले. शाळेतील स्नेहसंमेलन,वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला होता; परंतु त्यांना क्रिकेट खूप आवडायचे, ते खूप क्रिकेट खेळत होते. त्यांचे कॉलेजचे शिक्षण एस. पी. कॉलेजमध्ये झाले. पुणे युनिव्हर्सिटीमधून त्यांनी एम.बी.ए. केले. पिंपरी-चिंचवडमध्ये रामकृष्ण मोरे नाट्यगृह होते; परंतु तेथे नाटकाचे प्रयोग होतच नव्हते. त्यांच्या आईने सांगितले की, आम्हाला नाटकाचे प्रयोग पाहण्यासाठी पुण्याला जावे लागते.
पिंपरी-चिंचवडला नाटकाचे प्रयोग पाहण्यासाठी त्यांना काहीतरी करण्यास सांगितले. तेव्हा नितीन, तेथील गणपती मंडळाचे कार्यकर्ते होते, त्यांनी ग्रुप जमवला, त्यांना डिस्काउंटमध्ये तिकिटे देण्याचे आश्वासन दिले. नंतर मुंबईला येऊन निर्माते सुधीर भट, मोहन वाघ, प्रशांत दामले यांना भेटले व त्यांची नाटकाचा प्रयोग पिंपरी- चिंचवडला लावण्यास सांगितले. त्यानंतर गायक जगजित सिंग, सोनू निगम, संगीतकार अजय-अतुल यांचे काही कार्यक्रम केले.
त्यांचा मामेभाऊ उमेश कुलकर्णी एफ.टी.आय.मधून कोर्स करून बाहेर पडला होता. त्याने नितीनला बोलावले व सांगितले की ‘वळू’ नावाचा चित्रपट करायचा आहे व तू जॉइंट हो. त्यावेळी ते बँकेत नोकरी करत होते. ती नोकरी सोडून त्यांनी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून ‘वळू’ चित्रपटासाठी काम केले. या चित्रपटाचा निर्माता मध्येच पळून गेला, त्यामुळे त्यांनाच तो चित्रपट पूर्ण करावा लागला. वळूला सुरुवातीला चेन्नईहून आणावे लागले. नंतर तो सांगलीला सापडला. या चित्रपटाचे चार गावात शूटिंग करण्यात आले. हा चित्रपट त्यांच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरला.
त्यानंतर अनेक चित्रपटांचे ते कार्यकारी निर्माते व निर्माते झाले. आतापर्यंत त्यांनी जवळपास ४० चित्रपट निर्माण केले व त्यामध्ये देऊळ, नाळ १, हायवे, एकदा काय झालं, अलिबाबा आणि चाळीशीतील चोर, लाईक आणि सबस्क्राईब या चित्रपटांचा समावेश आहे.The
‘बिन लग्नाची गोष्ट ‘हा त्यांचा नवीन चित्रपट येतोय. काहींच्या मते लग्न आवश्यक आहे, ती आपली संस्कृती आहे, तर काहींच्या मते लग्न आवश्यक नाही, लिव्ह अॅण्ड रिलेशन असले तरी चालेल. लग्नाबद्दल भाष्य करणारा हा चित्रपट आहे. उमेश कामत व प्रिया बापट हे काही कारणास्तव लिव्ह अॅण्ड रिलेशनमध्ये राहत आहेत. प्रिया बापट प्रेग्नंट दाखविली आहे. गिरीश ओक, निवेदिता जोशी सराफ, सुकन्या कुलकर्णी मोने, संजय मोने हे लग्न हे आपल्या संस्कृतीचे मूळ आहे असे पटवून देतात. या चित्रपटाचे शूटिंग पुणे व लंडन येथे झाले आहे. या चित्रपटामध्ये तीन गाणी आहेत.
‘बिन लग्नाची गोष्ट’या चित्रपटाची गोष्ट हटके असली तरी ती आपलेपणाची भावना देणारी आहे. निवेदिता जोशी व गिरीश ओक यांसारखे अनुभवी कलाकार या कथेला अनेक भावनिक खोली प्रदान करतात. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच भावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.