रंगमंचीय नाट्यकलेची कृष्णकळा...

राजरंग : राज चिंचणकर


श्री  कृष्ण आणि त्याचे अवतारकार्य हा कायमच औत्सुक्याचा व अभ्यासाचा विषय बनून राहिला आहे. श्रीकृष्ण म्हणजे साक्षात वैश्विक सत्याची अनुभूती आणि त्यात समरसून जाताना या सत्याची अनेकविध रुपे मनःचक्षूंसमोर आपसूकच साकारत जातात. भगवंत म्हणून एकीकडे त्याच्यापुढे नतमस्तक होताना; या योगेश्वराच्या मानवी अवताराची व्याप्तीही मनात रुंजी घालत राहते आणि ही विलक्षण गोष्ट श्रीकृष्णाकडे डोळसपणे पाहण्यास प्रवृत्त करते.


त्याच्या बालपणाच्या लीलांपासून सखा, सवंगडी, प्रियतम ते थेट महाभारतातला योगेश्वर श्रीकृष्ण; असे त्याचे अनेकरंग अनुभवताना त्याच्या अंतरंगातल्या विलोभनीयतेची पखरण मनावर होत राहते. यातूनच त्याचे नीतीशास्त्र व युद्धशास्त्रनिपुण असे कार्य आणि कर्तृत्वही मनात ठाण मांडून बसते. या अंतरंगात इतके सारे काही सामावले असताना, त्यात ‘नाट्य’ येण्यास कितीसा अवकाश लागणार...? श्रीकृष्णाचे चरित्र हे कुठल्याही नाट्यापासून कमी नाही; उलट त्याच्या मानवी अवतारात पदोपदी नाट्यच दिसून येते.


साहजिकच, नाट्यसृष्टीत त्याच्या जीवनकार्याची पारायणे झाली नसती तर ते नवलच ठरले असते. श्रीकृष्णाच्या अवतारकार्याच्या अानुषंगाने त्याच्या चरित्रात नाट्यकला भरून राहिली असली, तरी या योगेश्वर श्रीकृष्णाला रंगमंचीय अवकाशाच्या मर्यादेत बांधून ठेवणे खरे तर अशक्यप्राय आहे. ‘कृष्णलीला’ या एका शब्दामागे श्रीकृष्णाच्या अनेक गोष्टी दडल्या असल्या, तरी त्यामागचा तर्कनिष्ठ विचार मात्र अभावानेच केलेला आढळतो. यातल्या चमत्काराचा पडदा बाजूला सारून या अंतरंगाचा वैज्ञानिक व डोळस दृष्टिकोनातून वेध घेण्यासाठी, मूळच्या कवयित्री असलेल्या रेश्मा कारखानीस यांनी त्यांच्या लेखणीद्वारे आणि रंगमंचीय सादरीकरणातून ‘कृष्णार्थ’ नामक नाट्याविष्कार निर्माण केला आहे.


‘कृष्णार्थ’ या शीर्षकातूनच एकप्रकारे रंगमंचीय नाट्यकलेच्या कृष्णकळेचे अवकाश प्रतिबिंबित होते. या पार्श्वभूमीवर, या नाट्यलेखनाच्या प्रक्रियेबाबत रेश्मा कारखानीस यांना विचारले असता त्या म्हणतात, “माझे वडील श्रीकृष्ण भक्त...! आमच्या घरी श्रीकृष्णाची पूजा व्हायची. तर्कनिष्ठ असल्याने व वैज्ञानिक दृष्टिकोन असल्याने, त्यावेळेस असे वाटायचे की, श्रीकृष्णाच्या चरित्रातला पूतनेचा वध किंवा कालियामर्दनाच्या वेळी इतका वेळ त्याचे पाण्यात उभे राहणे वगैरे असे सर्व काही त्याने इतक्या लहान वयात कसे काय केले असेल; असे अनेक प्रश्न मला पडत गेले. पण त्याची योग्य उत्तरे काही मिळत नव्हती.


कुणाला विचारल्यावर ‘त्या तर कृष्णाच्या देवलीला’ असे कानांवर यायचे. पण नंतर हळूहळू चिंतनातून मलाच या प्रश्नांची उत्तरे मिळत गेली आणि पुढे त्याच्या कविता होत गेल्या. यात मी काहीच ठरवून केलेले नाही. ही साधनाच असल्यासारखी आहे. मनात एखादा प्रश्न आला की त्याचे उत्तर म्हणून कविताच यायची. पुढे त्या कविता मी काही जणांना ऐकवल्या आणि त्यांना त्या आवडल्या. इथून हा लेखनप्रवास सुरू झाला”.


या लेखनाला दृश्य माध्यमातून सादर करावे असे का वाटले; याबाबत बोलताना त्या सांगतात, “या लेखनाला कुठल्या फॉर्ममध्ये आणायचे, याचा विचार सुरू होताच. कारण काय होते की प्रवचन, कीर्तन छानच असतात; पण असे किती तरुण प्रवचनाला जातात किंवा कथा ऐकायला किंवा कीर्तनाला जातात? पण आपण जर तर्कनिष्ठ प्रश्न मांडू शकलो आणि आपल्याकडच्या तरुणांना, त्यांना कुणा तिऱ्हाईतांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जर देता आली; तर त्यांना श्रीकृष्णाबद्दल आपुलकी वाटेल. कारण कृष्ण हा देव नाही; तर ती एक ‘फिलॉसॉफी’ आहे; स्वतःचे आयुष्य जगायचा एक मार्ग आहे.


कृष्णाला जो अभ्यासेल, त्याचे आयुष्य सोपे होऊन जाईल; हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळे मी असा विचार केला की हे सर्व अशा फॉर्ममध्ये आणायचे की जेणेकरून ते पाहणाऱ्यांना आनंदही मिळेल आणि त्यातून रसिकांना काहीतरी सोबत घेऊन जाता येईल.


त्यामुळे ‘कृष्णार्थ’ हा नाट्याविष्कार करणे मला योग्य वाटले. हा माझ्यासाठी सुद्धा एक ‘प्रयोग’ आहे. तसे पाहायला गेले तर हे कृष्णचरित्र आहे; पण मग हे कीर्तन आहे का, तर ते कीर्तन नाही. यात कविता आहेत, मग हे काव्यवाचन आहे का; तर तसेही नाही. तर यात नाट्य सुद्धा आहे. हा एक वेगळा फॉर्म आहे; जो आपोआपच तयार झाला आहे. श्रीकृष्णनीती समजून घ्यायची असेल, तर आधी श्रीकृष्णकृतीच्या मागचा खरा हेतू समजून घेतला पाहिजे”.

Comments
Add Comment

नाईलाजाच्या प्रदेशातील तीन डिसेबल्स

भालचंद्र कुबल यंदाच्या आय. एन. टी. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेला पन्नास वर्षे पूर्ण झाली. मी या स्पर्धेत

मराठी रंगभूमीचा एकमेव ‘सूत्रधार’...

रंगभूमीवर नाटकांचे सूत्रधार अनेक असतात, पण मराठी रंगभूमीला एखादा सूत्रधार असू शकतो का; या प्रश्नाचे उत्तर आता

मराठी चित्रपटात नावीन्य हवे

युवराज अवसरमल नावीन्याचा ध्यास घेऊन नवीन कलाकृती दिग्दर्शित करणारे अभिनेते व दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील

नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘रावण कॅालिंग’

मराठी पडद्यावर लवकरच एका थ्रिलर, कॅामेडी सिनेमाची एंट्री होणार असून येत्या नवीन वर्षात म्हणजेच ९ जानेवारी २०२६

‘रणपति शिवराय : स्वारी आग्रा’, शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प १९ फेब्रुवारीला चित्रपटगृहात

छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने

घटस्फोटातील नात्याची गोष्ट…!

मी मागे माझ्या एका लेखामधे म्हटले होते की, राज्यनाट्य स्पर्धेमधील काही नाटके व्यावसायिक दर्जाची असतातच. त्याला