
घरांच्या काचा फुटल्या
२५ किमी परिसरात आवाजाचे पडसाद
स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण
तलाठी, तहसीलदारांकडून शोध सुरू
दिंडोरी :जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात दुपारी अचानक आलेल्या जोरदार आवाजाने स्थानिक लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. जवळपास २५ किमी परिसरात हा आवाज ऐकू आला. हा हादरा इतका भयंकर होता की काही घरांच्या काचाही फुटल्याचे समोर आले. आवाजाच्या पार्श्वभूमीवर तलाठी व तहसीलदारांनी याचा शोध सुरू केला. त्यातच पोलिसांनी आवाजाबाबत महत्त्वाची माहिती दिली.
भूकंपाचा तीव्र धक्का की मोठा अपघात झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली. परंतु पोलीस तपासात वेगळेच सत्य समोर आले. हा आवाज नाशिकच्या ओझर इथल्या लढाऊ विमानांच्या कारखान्यात तयार होणाऱ्या सुखोई विमानाचा होता. हिंदुस्थान अरोनॉटिक्स लिमिटेडकडून ही विमाने तयार केली जातात. त्यात सुखोई या लढाऊ विमानाच्या सरावाचा हा आवाज होता. सरावावेळी विमान जमिनीच्या अगदी जवळून उडत अवकाशात गेले.
ज्यामुळे प्रचंड मोठा आवाज झाला व त्यात दिंडोरी भागातील घरांच्या काचा फुटल्याचे समोर आले. तर संबंधित प्रकाराबाबत एचएलएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पोलिसांनी माहिती घेतली. त्यात सुखोई विमानाचा सॉनिक बूम झाल्याने आवाज येतो.
नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी म्हटले आहे की, झालेल्या घटनेसंदर्भात एचएएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे झालेले आहे.
संपूर्ण माहिती घेण्यात आलेली आहे. सुखोई विमानाचा सॉंनिक बूम झाल्याने आवाज येतो. ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने जेव्हा सुखोई विमान प्रवास करते, त्यावेळेस अशा स्वरूपाचा आवाज होतो. या आवाजाने आजूबाजूच्या वातावरणात भीती निर्माण होण्याची शक्यता असते, तसाच प्रकार दिंडोरीत घडला आहे.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कुठलीही दुर्घटना दिंडोरीच्या परिसरात झालेली नाही. विमान जवळून गेल्याने खूप मोठा आवाज झाला होता. याबाबतचा अधिक तपास आम्ही करत आहोत. मात्र, कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे.