जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीत मृतांचा आकडा ६५ वर पोहोचला आहे. त्यात दोन सीआयएसएफ जवानांचा समावेश आहे तर सुमारे १०० जखमी झाले आहेत. एनडीआरएफ तसेच राज्याच्या आपत्ती निवारण पथकांकडून बचावकार्य सुरूच आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना फोन करुन परिस्थितीची माहिती घेतली. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. ही ढगफुटीची घटना चसौती गावाजवळ घडली.
या गावाजवळ भाविक मोठ्या संख्येने मचैल माता यात्रेला जाण्यासाठी जमले होते. तिथून मंदिरापर्यंत ८.५ किमी पायी चालत जावे लागते. चसौती हे गाव ९,५०० फूट उंचीवर आहे. ते किश्तवाडपासून सुमारे ९० किमी अंतरावर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १६७ जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले आहे. यातील ३८ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. अचानक आलेल्या पुरामुळे यात्रेसाठी उभारण्यात आलेली सामुदायिक स्वयंपाकाची व्यवस्था (लंगर) आणि एका सुरक्षा चौकीचे नुकसान झाले आहे. २१ मृतदेहांची ओळख पटली आहे. आतापर्यंत १६७ जणांना वाचवण्यात आले आहे. त्यापैकी ३८ जणांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री अब्दुल्ला म्हणाले की, १०० हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत.