Sunday, April 12, 2026
Nari Shakti Vandan

आनंदाची बातमी, मुंबईचे ससून बंदर होणार 'ग्लोबल'

आनंदाची बातमी, मुंबईचे ससून बंदर होणार 'ग्लोबल'

जगातील सर्वोत्तम बंदर बनविण्याचा मंत्री नितेश राणे यांचा संकल्प; फिनलंडच्या मदतीने कायापालट करणार

मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या ससून मासेमारी बंदराला जगातील सर्वोत्तम बंदर बनविण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. ससून डॉकचा चेहरामोहरा बदलण्यासाठी फिनलंडमधील कंपन्यांसोबत महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाने सामंजस्य करार केला असून, यामुळे हे बंदर आधुनिक, स्वच्छ आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत होईल, असा विश्वास मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजित कार्यक्रमात फिनलंडमधील हेल्वर, मिरासिस आणि रिव्हर रीसायकल या तीन कंपन्यांसोबत हा करार करण्यात आला. याप्रसंगी फिनलंडचे वाणिज्यदूत एरिक अफ हॅलोस्ट्रॉम, इंग्लंडच्या परराष्ट्र मंत्रालयाचे राज्य सचिव जुका सोलोवारा, राज्याचे मत्स्य व्यवसाय सचिव एन. रामास्वामी, आयुक्त विजय सूर्यवंशी, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपाले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले की, "मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीचा जुना ससून डॉक आणि केंद्र-राज्य शासनाच्या अखत्यारीतील नवीन डॉक हे मासेमारी समुदायासाठी महत्त्वाचे आर्थिक केंद्र आहे. येथे १ हजार ५६० नोंदणीकृत नौका असून वार्षिक सरासरी ५० ते ६० हजार मेट्रिक टन मासळीची उलाढाल होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ससून डॉकला जागतिक मानकांनुसार आदर्श बंदर बनवणे हे आमचे ध्येय आहे", असे त्यांनी सांगितले. ससून डॉक परिसरात गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने नेट मेंडिंग शेड, वर्कशॉप, भूमिगत पाण्याची टाकी, संरक्षण भिंत आणि सुरक्षा रक्षक घरांचे नूतनीकरण आदी कामांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे बर्फ संयंत्र, घाटाच्या भिंतीचे मजबुतीकरण, मच्छिमारांसाठी विश्रांती कक्ष आणि आधुनिक लिलाव हॉलची कामे प्रगतीपथावर आहेत.

प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर होणार

फिनलंडमधील तीनही कंपन्यांच्या सहकार्याने ससून डॉक अधिक सुरक्षित आणि आधुनिक केले जाणार आहे. यात प्रामुख्याने प्लास्टिक कचरा पुनर्वापर, टाकून दिलेल्या मासेमारी जाळ्यांचे व्यवस्थापन आणि प्रगत नेट दुरुस्ती प्रणालीवर भर दिला जाईल. तंत्रज्ञानाचा विस्तार आणि डिजिटायझेशनद्वारे मच्छिमार समुदायाची प्रगती साधण्याचा शासनाचा मानस असल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले. ससून डॉकला केवळ पायाभूत सुविधांपर्यंत मर्यादित न ठेवता, ते प्रगती, नावीन्य आणि समृद्धीचे प्रतीक बनविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Comments
Add Comment