लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

  27

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण


मुंबई : काही वर्षांपूर्वी आपण ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ हे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारात असून वर्षाला किमान ५० किलोमीटरचे मेट्रो मार्ग पूर्ण होत आहेत. तसेच रस्त्यांचे जाळे चांगल्या प्रकारे उभारले जात असून वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करणाऱ्या दोन महत्त्वाच्या लिंक पुलांचे लोकार्पण करण्यात आले आहे. यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगर प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईकरांसाठी या प्रकल्पांचे लोकार्पण करताना आनंद होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


वांद्रे येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पोडियम येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि बृहन्मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण झाले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी उपस्थित होते.


उद्यापासून (१५ ऑगस्ट) मुंबईतील कोस्टल रोड नागरिकांसाठी २४ तास खुला असणार असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, वाहनचालकांनी कोस्टल रोडवर वाहतूक नियमांचे पालन करावे, संपूर्ण कोस्टल रोड सीसीटीव्ही च्या निरिक्षणाखाली आहे. हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टिकोनातून क्रांतिकारी ठरणार आहे. यात पादचाऱ्यांसाठी प्रेक्षणीय असे वॉकिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक यांचा समावेश आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी समांतर मार्ग तयार केले जात आहेत. मुंबईतील विविध भागांना जोडणारे टनेल्स, लिंक पूल आणि उड्डाणपूल हे वाहतूक सुलभीकरणासाठी उपयुक्त ठरणार आहेत. २०२८-२९ पर्यंत मुंबईत सुरू असलेले विकास प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबईचा विकास करत असताना तो पर्यावरणस्नेही असावा यासाठी आग्रही आहोत. पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून शाश्वत विकास करता येणार नाही. त्यामुळे विकास प्रकल्प राबवताना पर्यावरणाचा विचार प्रथम केला जात आहे. नव्याने उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पांसाठी परदेशातील तंत्रज्ञानांपेक्षा चांगल्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. लवकरच उपनगरीय रेल्वेतही मेट्रोसारखे वातानुकूलित, स्वयंचलित दरवाजे असलेले डबे उपलब्ध होतील. मेट्रो प्रकल्प केवळ वाहतूक सुधारण्यासाठी नसून, रोजगार निर्मितीचाही एक प्रभावी मार्ग आहे. कर्मचाऱ्यांना चांगले निवास व सुविधा दिल्यास त्यांची कार्यक्षमता वाढते. विकासात कोणतीही तडजोड न करता, मुंबईच्या प्रगतीचा वेग अधिक वाढवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे नागरिकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडत आहेत. मेट्रोचे जाळे ४५० किमीपेक्षा जास्त विस्तारले असून, त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवास सुकर होईल. वाहतूक कोंडी कमी होईल, इंधनाची बचत होईल आणि वेळ वाचेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मेट्रो आणि इतर प्रकल्प वेगाने राबवले जात आहेत. काही प्रकल्प नियोजित वेळेआधी पूर्ण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.


उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, मुंबईच्या प्रगतीचा वेग देशाच्या विकासासाठी अनिवार्य आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने तिच्या सर्वांगीण विकासासाठी विकास कामे केली जात आहेत. सार्वजनिक सुरक्षितता आणि दर्जेदार पायाभूत सुविधा यासाठी शासन कटिबद्ध आहे.


यावेळी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने मंडळे येथे उभारलेल्या ७० कोटी रुपयांच्या मेट्रो प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रशिक्षण संस्थेमुळे मेट्रो साठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार असून प्रशिक्षणासाठीचा खर्च वाचणार आहे. तर इतर राज्यातील मेट्रो प्रकल्पासाठीचे मनुष्यबळ प्रशिक्षित करून महसूल मिळणार आहे. तसेच चेंबूर – सांताक्रुझ लिंक केबल स्टेड पूल, रोड भाग १ हा अशिया खंडातील १०० मीटर त्रिज्येचा सर्वात मोठा वक्राकार केबल स्टेड पूल आहे. तसेच९० कोटी रुपयांच्या मालवणी येथील कर्मचारी निवासस्थान इमारत ज्यामध्ये एकूण १५६ सदनिका असणाऱ्या दोन इमारती आहेत. कलानगर जंक्शन येथील आर्म डी उड्डाणपूल तसेच धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्त्यावरील ५ . २५ कि.मी लांबीच्या विहार क्षेत्र, पादचारी भुयारी मार्गाचे लोकार्पण करण्यात आले.



लोकार्पण झालेल्या विविध प्रकल्पांची सविस्तर माहिती.


दक्षिण आशियातील १०० मीटर त्रिज्येची वक्रता असलेला पहिलाच केबल स्टेड ब्रीज विस्तारित सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड भाग-१


मुंबई नागरी सुविधा प्रकल्पांतर्गत (MUIP) सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडची (SCLR) योजना आखण्यात आली आहे.
सिग्नल विरहित पूर्व-पश्चिम कॉरिडॉर कनेक्टिव्हिटीसाठी आणि नवी मुंबई, पुर्व द्रुतगती महामार्ग तसेच बीकेसी कडून विमानतळाकडे येणाऱ्या वाहतुकीचे सुयोग्य नियमन करण्यासाठी सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडची योजना आखण्यात आली होती.
प्रकल्पाची एकूण लांबी ५. ५० किमी असून यापैकी ३. ८५ कि.मी. लांबी २०२३ मध्ये वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.
सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड भाग-1 प्रकल्पातील १. ६६कि.मी. उर्वरित लांबीच्या मुंबई विद्यापीठ प्रवेशव्दार क्रमांक-2 (उत्तर बाजू) ते पानबाई इंटरनॅशनल स्कूल (पश्चिम द्रुतगती महामार्ग) या उन्नतमार्गिकेचे लोकार्पण आज करण्यात येत आहे.
पश्चिम द्रुतगती महामार्ग ओलांडणीसाठी सिग्नल विरहित पूर्व-पश्चिम कॉरिडॉर कनेक्टिव्हिटीसाठी आणि पुर्व द्रुतगती महामार्ग तसेच बीकेसी कडून विमानतळाकडे येणाऱ्या वाहतुकीचे सुयोग्य नियमन करण्यासाठी केबल स्टेड ब्रीज बांधला आहे.
केबल स्टेड ब्रीजमध्ये २१५ मीटर लांबीचा स्पॅन, आहे. तसेच हा दक्षिण आशियातील १०० मीटर त्रिज्येची वक्रता असलेला पहिलाच केबल स्टेड ब्रीज आहे. ज्यामध्ये ऑथॉट्रॉफिक स्टीलडेकचा समावेश आहे. ब्रीजमधील केबल स्टेड ब्रीजच्या सुपरस्ट्रक्चरचा भार केबलद्वारे ‘वाय ‘आकाराच्या एका पायलॉनवर हस्तांतरीत होत असल्यामुळे ब्रीजच्या-पिअर्सची संख्या कमी होण्यास मदत झाली आहे. केबल स्टेड ब्रीजची रुदी १०. ५० मी. ते १७. २० मी. पर्यंत असून हा दोन मार्गिकेचा ब्रीज आहे. सदर ब्रीज जमिनीपासून सुमारे २५ मीटर उंचीवर असून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाकोला फ्लायओव्हर वरून जातो. पुढे हि मार्गिका सांताक्रुझ येथील पानबाई इंटरनॅशनल स्कूलजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गामध्ये विलीन होते.
फायदे: कुर्ला ते विमानतळ दरम्यान सिग्नलविरहित प्रवास, पश्चिम द्रुतगती महामार्ग वरील हंसभुग्रा जंक्शन, वाकोला जंक्शन येथिल वाहतुक कॉडी सुटेल, प्रवासाचा वेळ आणि इंधानाची बचत होईल
प्रकल्पाचा एकूण खर्च : २०० कोटी रुपये.



देशातील सगळ्यात मोठी मेट्रो प्रशिक्षण संस्था मुंबई


मुंबई मेट्रो प्रशिक्षण संस्था (एमएमटीआय) चे अनावरण


एमएमआरडीएमार्फत ३०० कि.मी.हून अधिक प्रस्तावित मेट्रो प्रकल्पांसाठी कुशल आणि सक्षम मनुष्यबळ घडवणे याकरिता प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन, मुं.प्र.वि.प्रा. मार्फत मुंबई मेट्रो प्रशिक्षण संस्था (एमएमटीआय) मंडाले डेपो येथे विकसित करण्यात आली आहे.
प्रकल्पाच्या पहिला टप्प्यात प्रगत मेट्रो ड्रायव्हिंग सिम्युलेटर, १२ मॉड्यूल देखभाल सिम्युलेटर, सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण कक्ष इत्यादी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रशिक्षण केंद्राचा एकूण बांधकाम, सिम्युलेटर आणि प्रणाली या करिता रुपये ६९ कोटी इतका खर्च झाला आहे.
या केंद्रामुळे प्रशिक्षणाचा दर्जा वाढेल, खर्चाची बचत होईल, तसेचकर्मचाऱ्यांची आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची तयारी व देखभाल कौशल्ये इ. विकसित होतील. या केंद्रामुळे पुढील १0 वर्षांत आवश्यकप्रशिक्षणावरीलसुमारे २२५ कोटी रुपयांची बचत होईल.
निवासी सुविधा, डिजिटल-आधारित शिक्षण व जागतिक मानकांची पायाभूत व्यवस्था यामुळे हे केंद्र केवळ मुंबईसाठीच नव्हे तर देशभरातील मेट्रो प्रकल्पांसाठी उपयुक्त ठरेल.
प्रकल्प खर्च—७० कोटी रुपये.



मालवणी, मालाड (प), मुंबई येथील कर्मचारी निवासस्थान इमारत


मुंबई महानगर क्षेत्रात (MMR), मुं.म.प्र.वि.प्रा मार्फत एकूण ३३७ कि.मी. लांबीचे मेट्रो रेल्वेचे विस्तृत जाळे उभारले जात आहे. मेट्रो संचलनासाठी अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय करणेकरीता विस्तृत प्रकल्प अहवालांमध्ये (DPR) विविध मेट्रो डेपोच्या ठिकाणी कर्मचारी निवास्थाने बांधणे प्रस्तावित होते.
त्याप्रमाणे, मेट्रो मार्ग २-अ च्या चारकोप, मालवणी येथील मेट्रो डेपोच्या जागेमध्ये एकूण चार इमारती कर्मचारी निवास्थानांसाठी व एक इमारत वाहनतळासाठी बांधण्यात येत आहेत. यापैकी दोन इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
या दोन इमारतींमध्ये एकूण १५६ सदनिका असून, इमारत ‘अ मध्ये १ बेडरुम-हॉल- किचन असलेल्या ७८ सदनिका असून इमारत ‘ब मध्ये २ बेडरुम-हॉल-किचन असलेल्या ७८ सदनिका आहेत. १ बेडरुम हॉल- किचन असणाऱ्या सदनिकेचे चटई क्षेत्रफळ ६५५ स्क्वे. फूट असून २ बेडरुम-हॉल- किचन चे चटई क्षेत्रफळ ८८५ स्क्वे. फूट इतके आहे. या दोन इमारतींचा एकूण बांधकाम खर्च ९० कोटी रु. इतका आहे.



कलानगर उड्डाणपुलाचा आर्म डी (सायन-वांद्रे लिंक रोडपासून वांद्रे वरळी सी लिंककडे)


कलानगर उड्डाणपुलाचे टप्याटप्याने काम पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण करण्यात आले असून त्याचा धारावी ते वांद्रे वरळी सी लिंक या उन्नतमार्गाचा आर्म डी हा अंतिम भाग वाहतुकीसाठी खुला होत आहे.
कलानगर उड्डाणपुलाचा धारावीच्या दिशेने येणारा हा उपउड्डाणपूल सायन-बांद्रा लिंक रोडला थेट बांद्रा-वरळी सी लिंकशी जोडला जातो. या ३४० मीटर लांबी आणि ८. ५ मीटर रुंदीच्या पुलासाठी २० कोटी रुपये इतका खर्च झाला आहे.


उपउड्डाणपूल केवळ एक रस्ता नसून मुंबईच्या पश्चिम भागाला धारावीशी जोडणारा सी-लिंक हा एक महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे कलानगर जंक्शनवरील वाहतूक कोंडी कमी होईल. मुंबईसारख्या वेगाने धावणाऱ्या शहरात, ही केवळ काही मिनिटांची नव्हे, तर दररोज हजारो तासांची बचत होईल.

Comments
Add Comment

बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे; मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ मुंबई : मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — ॲड. राहुल नार्वेकर

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे —  नीलम गोऱ्हे मुंबई : विधानपरिषद

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा – मंगलप्रभात लोढा

मुंबई : भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या फाळणीच्या दाहकतेचा निषेध करत राज्यातल्या हजारो आयटीआयमध्ये विभाजन

टीटीएफ २०२५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा सहभाग महाराष्ट्राचे दालन ठरले ‘सर्वोत्कृष्ट’

मुंबई : वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे  ‘ट्रॅव्हल ट्रेड फेअर २०२५’  (टीटीएफ) या पर्यटनाशी निगडीत

गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदत वाढवली, 'ही' आहे अखेरची मुदत

मुंबई : राज्यात वाहनांबाबत काही महिन्यांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता . १ एप्रिल २०१९ पूर्वी