पहिल्या टप्प्यातील ५५६ पुनर्वसन सदनिकांचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
मुंबई : आशियातील नागरी पुनरुत्थानाचा सर्वात मोठा बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प आता ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत वरळी बीडीडी चाळ प्रकल्पात पूर्ण झालेल्या दोन पुनर्वसन इमारतींतील एकूण ५५६ पात्र रहिवाशांना सदनिकांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माटुंगा पश्चिम येथील यशवंत नाट्य मंदिर येथे गुरुवारी १४ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात येणार आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प राज्य शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असून म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याअंतर्गत उभारण्यात आलेल्या इमारत क्रमांक ०१ मधील डी व ई विंग मधील ५५६ पुनर्वसन सदनिकांच्या वितरण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मुंबई उपनगराचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगराचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाद्वारे १२१ जुन्या चाळींतील ९ हजार ६८९ रहिवाशांचे पुनर्वसन होणार आहे. म्हाडातर्फे वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात प्रकल्पाच्या एकूण भूखंडापैकी ६५ टक्के जागेचा पुनर्वसनासाठी वापर करण्यात आला आहे. १६० चौरस फुटाच्या खोलीत राहणाऱ्या पात्र रहिवाशांना पुनर्वसन इमारतीत ५०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त २ बीएचके सदनिका मालकी तत्त्वावर विनामुल्य वितरित केली जाणार आहे. ४० मजल्यांच्या ३४ पुनर्वसन इमारती उभारण्यात येणार इमारत क्रमांक एक मधील डी व ई विंग मधील ५५६ सदनिकांचे वितरण केले जाणार आहे.
स्टील्ट + पार्ट सहा मजली पोडियम पार्किंगमध्ये प्रत्येक सदनिकाधारकास एकास एक पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोडियम पार्किंगच्यावर सातव्या मजल्यावर पर्यावरण पूरक उद्यानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पुनर्वसन सदनिकेत व्हिट्रीफाईड टाईल, ग्रेनाइट ओटा, अॅल्युमिनियम फ्रेमच्या खिडक्या, ग्रानाईट स्वयंपाकचा ओट्टा, ब्रांडेड प्लंबिंग फिटिंग्स आदी सारख्या अनेक सुविधा देण्यात आल्या असून इमारतीत अग्निरोधक यंत्रणा, तीन लिफ्ट, १ स्ट्रेचर लिफ्ट, १ फायर लिफ्ट देण्यात आली आहे.
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत एक स्वयंपूर्ण वसाहतीचे निर्माण होणार असून यामध्ये स्वतंत्र व्यापारी संकुल शाळा, व्यायामशाळा, रुग्णालय, वसतिगृह आदी सुविधांचे नियोजन असून मलनिस्सारण प्रकल्प, सौर ऊर्जा प्रणाली, पर्जन्यजल संचयन आदी सुविधा असणार आहेत. वरळी प्रकल्पातील पुनर्वसित इमारतींची 'म्हाडा'तर्फे बारा वर्षे देखभाल केली जाणार असून मुंबईच्या राजकीय व सांस्कृतिक घडामोडींचे साक्षीदार जांबोरी मैदान व आंबेडकर मैदानाचे जतन केले जाणार आहे. चाळीतील जुन्या इमारतीचे 'जैसे थे' जतन करुन म्हाडातर्फे संग्रहालय बनविण्यात येणार आहे. या माध्यमातून बीडीडी चाळींची माहिती व वारसा जतन करण्याचा प्रयत्न केला जाणार असून भावी पिढीला याद्वारे बीडीडी चाळींच्या इतिहासाबाबत माहिती उपलब्ध करुन देण्याचा उद्देश आहे.