मुंबई: लोकप्रिय मालिका "आई तुळजाभवानी" मध्ये लवकरच एक रोमांचक आणि आध्यात्मिक अध्याय सुरू होणार आहे. या विशेष भागामध्ये, स्वतः महादेव जगदंबेला षड्रिपूंचा (काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर) नाश करण्यासाठी योगविद्येचं गहन ज्ञान देणार आहेत.
या भागात महादेव जगदंबेला सांगतात की योगविद्या केवळ दिव्यदृष्टी मिळवण्यासाठी नसून, अंतर्मनातील दुर्गुणांचा नाश करण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे. ते तिला योगाचे महत्त्व, पद्मासन बसण्याची योग्य पद्धत, श्वासावर नियंत्रण आणि एकाग्रतेची शक्ती शिकवतात.
महादेवाच्या मार्गदर्शनाखाली जगदंबा ध्यान करते आणि तिची एकाग्रता इतकी वाढते की ती पंचमहाभूतांवर (पाणी, आग, माती, वायू आणि आकाश) नियंत्रण मिळवते. तिच्या या सिद्धीमुळे तिच्या कपाळावर तुळजाभवानीचा मळवट प्रकट होतो आणि तिच्याभोवती तेजाची प्रभा पसरते. आपल्या शिष्याचे हे यश पाहून महादेव आनंदित होतात.
मात्र, महादेवाचं हे हास्य क्षणभंगुर ठरतं. यानंतर नेमकं काय घडतं आणि महादेवांनी दिलेल्या योगविद्येच्या मदतीने जगदंबा षड्रिपूंचा संहार कसा करणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना १७ ऑगस्ट, रविवार रोजी रात्री ९ वाजता कलर्स मराठीवर "आई तुळजाभवानी"चा महाएपिसोड पाहावा लागेल.