मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या आणि जल्लोषाचा अनोखा माहोल निर्माण करणाऱ्या दहीहंडी उत्सवाला आता फक्त काही दिवस उरले आहेत. सध्या सर्वत्र "धाकुमाकूम… धाकुमाकूम… गोविंदा रे गोपाळा"च्या घोषणा देत गोविंदा पथके सराव करताना दिसत आहेत. मुंबई, ठाणे, कल्याणसह राज्यभरातील अनेक शहरांमध्ये भव्य दहीहंडी उत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. मुंबईतील लालबाग, दादर, वरळी या ठिकाणी दहीहंडीचा थरार दरवर्षीप्रमाणे यंदाही रंगणार असून, ठाण्यातील विविध भागांतही आकर्षक आणि भव्य दहीहंड्यांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी विशेष दखल घेण्यासारखी ठरते. ही दहीहंडी राज्यातील सर्वात मोठी आणि भव्य मानली जाते. यंदा या दहीहंडी महोत्सवाचे २० वे वर्ष असून, आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने या सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या विशेष निमित्ताने प्रतिष्ठानतर्फे गोविंदा पथकांसाठी आकर्षक आणि मोठ्या बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचा आणि स्पर्धेचा माहोल सुरु आहे.
यंदा शोले चित्रपटावर थीम आधारित
यंदा प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित भव्य दहीहंडी महोत्सवाला एक खास वैशिष्ट्य देण्यात आलंय. या वर्षीची संकल्पना (थीम) लोकप्रिय "शोले" चित्रपटावर आधारित असून, त्यानुसार सजावट, मंचरचना आणि संपूर्ण वातावरण चित्रपटातील थराराची अनुभूती देणार आहे. या वर्षीच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे स्पेनमधील १११ खेळाडूंचे पथक, जे साहसी पिरॅमिड रचून आपली खास कसरत सादर करणार आहे. या खेळाडूंचा सहभाग दहीहंडी उत्सवाला एक वेगळे आंतरराष्ट्रीय स्वरूप देत आहे. स्पॅनिश पथक आपला थरारक कार्यक्रम गेटवे ऑफ इंडिया येथून सलामी देत सुरू करणार असून, त्यानंतर ते ठाण्यातील महोत्सवस्थळी पोहोचून गोविंदांच्या जल्लोषात सहभागी होतील. १११ खेळाडूंच्या या संघाकडून सादर होणारा थरार प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय क्षण ठरणार आहे.
महिला गोविंदांसाठीही खास पारितोषिक
यंदाच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी महोत्सवात गोविंद पथकांसाठी आकर्षक आणि भल्यामोठ्या बक्षिसांची मेजवानी सजवण्यात आली आहे. यामध्ये जागतिक विक्रम मोडणाऱ्या पथकाला तब्बल २१ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे, जे या उत्सवाचे सर्वात मोठे बक्षीस ठरणार आहे. तसेच, ९ थर लावणाऱ्या पहिल्या पथकाला ११ लाख रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय, ८ थर गाठणाऱ्या पथकासाठी २५ हजार, ७ थरांसाठी १५ हजार, आणि ६ थर पूर्ण करणाऱ्या पथकासाठी १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेत महिला पथकांनाही खास प्रोत्साहन देण्यात आले आहे. महिला गोविंदांसाठी ७ थर लावण्याचे आव्हान ठेवले असून, हे आव्हान पूर्ण करणाऱ्या महिला पथकांनाही योग्य ते रोख बक्षीस दिले जाणार आहे. यामुळे पुरुषांसह महिला गोविंदांचाही जल्लोष आणि उत्साह उंचावणार आहे.
दरवर्षीप्रमाणे, यंदाही संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी महोत्सवात गोविंदांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक गोविंदासाठी हेल्मेट, सेफ्टी किट, मॅट आणि जॅकेटचा वापर सक्तीने करण्यात येणार आहे, ज्यामुळे अपघाताचा धोका कमी होईल. याशिवाय, आयोजकांनी तब्बल १ लाख २६ हजार गोविंदांचा विमा काढत सुरक्षा व्यवस्थेत भक्कम पाऊल टाकले आहे. उत्सवात अनेक लोकप्रिय कलाकार हजेरी लावणार असून, यंदा ‘शोले’ चित्रपटाचे ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने खास थीम निवडण्यात आली आहे. त्यामुळे थरार, मनोरंजन आणि सुरक्षिततेचा मिलाफ असलेला हा दहीहंडी सोहळा अधिकच रंगतदार होणार आहे.
ओडिसा: ओडिसामधील पुरी येथील जगन्नाथ मंदिर हे प्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे. मात्र, हे जगन्नाथ मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ...
धर्मवीर आनंद दिघे साहेबांची मानाची दहीहंडी
ठाण्यातील दहीहंडी उत्सवाची शान वाढवणाऱ्या अनेक भव्य हंड्यांपैकी संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेते. विक्रमी रोख बक्षिसे, आंतरराष्ट्रीय पाहुण्यांची उपस्थिती आणि अनोख्या संकल्पनांमुळे हा उत्सव नेहमीच चर्चेत असतो. याशिवाय, ठाण्यात टेंभी नाक्यावर होणारी धर्मवीर आनंद दिघे साहेबांची दहीहंडी आणि पाचपाखाडीतील जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने आयोजित केली जाणारी दहीहंडी देखील तितकीच लोकप्रिय आहे. प्रत्येक दहीहंडीची स्वतःची एक वेगळी ओळख असून, ठाण्याच्या सांस्कृतिक आणि सणसुदीच्या परंपरेत त्यांचे खास स्थान आहे.
स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी
ठाण्यातील स्वामी प्रतिष्ठानची दहीहंडी हा उत्सवाचा आणखी एक आकर्षक सोहळा आहे, जो भाजपचे स्थानिक नेते शिवाजी पाटील यांच्या पुढाकाराने दरवर्षी मोठ्या उत्साहात आयोजित केला जातो. या दहीहंडीचे सर्वात वेगळे आणि हृदयाला भिडणारे वैशिष्ट्य म्हणजे अंध मुलांकडून दिली जाणारी पाच थरांची सलामी, जी पाहणाऱ्यांचे मन हेलावून टाकते आणि उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेते. या दहीहंडीतही मोठ्या रकमेची बक्षिसे जाहीर करून गोविंद पथकांचा उत्साह वाढवला जातो. आज ठाण्यातील दहीहंडी केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती आता एक साहसी खेळाच्या स्वरूपात विकसित झाली आहे. बहुतांश मोठ्या दहीहंड्यांना स्थानिक राजकीय नेत्यांचा पाठिंबा मिळत असल्यामुळे त्यांना भव्य आणि आकर्षक स्वरूप प्राप्त होते, ज्यामुळे काही ठिकाणी हा सोहळा ‘राजकीय दहीहंडी’ म्हणूनही ओळखला जातो. अलीकडच्या काळात सुरू झालेल्या ‘प्रो गोविंदा’ स्पर्धेमुळे गोविंदांना अधिक सुरक्षितपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने खेळता येते. या स्पर्धांमध्ये हेल्मेट, सेफ्टी मॅट्स आणि संरक्षक साधनांचा वापर अनिवार्य केला जातो. तसेच, शासनाने दहीहंडीला अधिकृतपणे साहसी खेळाचा दर्जा दिल्यामुळे गोविंदांना भविष्यात नोकरी किंवा इतर संधी मिळवण्यासाठीही त्याचा लाभ होऊ शकतो. अपघात टाळण्यासाठी आयोजक आणि प्रशासन दोन्ही बाजूंनी विशेष काळजी घेतली जाते, ज्यामुळे हा पारंपरिक उत्सव सुरक्षित आणि आनंदी वातावरणात पार पडतो.