"हा जनआक्रोश नाही तर मनआक्रोश आहे" - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लातूर: उबाठा पक्षाकडून राज्यात ठिकठिकाणी जनआक्रोश आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी ‘मुख्यमंत्री हे चीप मिनिस्टर नसून थीप मिनिस्टर आहेत. ते चोरांचे सरदार आहेत’, अशी टीका केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना चोख प्रत्युत्तर दिले. "उद्धवजी यांनी तर जनादेशाची चोरी केली होती. ते जनादेशचोर आहेत." असा पलटवार त्यांनी केला. सध्या मुख्यमंत्री लातूर दौऱ्यावर असून, यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
आम्ही लोकांच्या प्रेमाची चोरी करतो
उद्धव ठाकरे यांच्या टिकेला उत्तर देताना, फडणवीस म्हणाले, "आम्ही लोकांच्या प्रेमाची चोरी करतो. त्यांच्या मनाची चोरी करतो. म्हणून लोकं आम्हाला भरभरून मतदान करतात. पण, उद्धवजी यांनी तर जनादेशाची चोरी केली होती. ते जनादेशचोर आहेत. म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवले आहे. लोकशाहीमध्ये कसे वागायचे, हे जनादेशचोरांनी आम्हाला शिकवू नये. ते स्वत: जानदेशचोर आणि त्यांचे चेलेचपाटे कफनचोर आहेत. कोविड काळात त्यांच्या सहकाऱ्यांनी कफन चोरले. त्यातही पैसा कमवला. म्हणून उद्धव ठाकरे यांना कफनचोरांचे सरदार म्हणायचे का?" अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच, हा जनआक्रोश नव्हे तर त्यांचा मनआक्रोश आहे, अशा शब्दांत आंदोलनाची खिल्ली उडवली. उद्धवजी यांची सत्ता गेली, खुर्ची गेली पण, मन मानत नाही. म्हणून त्यांचा मनआक्रोश सुरू आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनावर काय म्हणाले मुख्यमंत्री?
दिल्ली येथे 'वोट चोरी’ च्या मुद्द्यावर राहुल गांधी यांच्यासह विरोधकांद्वारे मोठे आंदोलन करण्यात आले. याबाबत ही त्यांनी सरकारची बाजू स्पष्ट करताना इंडिया आघाडीच्या आंदोलकांवर ताशेरे ओढले."भारतीय संविधानावर आणि न्यायव्यवस्थेवर या लोकांचा अजिबात विश्वास नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिले त्या संविधानाला समोर ठेवून तयार झालेल्या निवडणूक आयोगाने त्यांना आत्तापर्यंत ४ पत्र पाठवली. तुम्ही जे सांगत आहात तेच येथे येऊन प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करून सांगा. पण, त्यांच्यात हिंमत नाही. ते जात नाहीत, पुरावेही देत नाहीत. याचा अर्थ ते पळपुटे लोक आहेत. दररोज खोटं बोलायचं अन् पळून जायचं, हे त्यांचे धोरण आहे. त्यांच्याजवळ कसलेच पुरावे नाहीत. त्यांचा दररोज पराभव होत आहे. तो सहन करता येत नाही आणि सांगताही येत नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे" अशी टीकाही फडणवीस यांनी यावेळी केली.