Thane Varsha Marathon Winner: ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉनचे विजेते जाहीर! पुरुष गटात धर्मेंद्र आणि महिला गटात रविना गायकवाड ठरले विजेते

ठाणे,: 'मॅरेथॉन ठाण्याची.. उर्जा तरुणाईची' या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या एकतिसाव्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन या स्पर्धेत पुरुष गटात पुण्याच्या एएसआयच्या धर्मेंद्र याने अव्वल स्थान पटकावले. त्याने ०१ तास ०७ मिनिटे आणि ४१ सेकंद वेळेसह २१ किमीचे अंतर पार केले. तर, महिला गटात नाशिकच्या रविना गायकवाड यांनी ०१ तास २५ मिनिटे आणि ४६ सेकंद वेळ घेत शर्यत पूर्ण केली. या स्पर्धेत सुमारे २५ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मॅरेथॉनला झेंडा दाखवला. तर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना गौरविण्यात आले.



उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मॅरेथॉनमध्ये धावण्याचा आनंद घेतला




कोरोनापासून गेली पाच वर्षे खंडित झालेली ही स्पर्धा यंदा आबालवृद्धांच्या सहभागाने अत्यंत उत्साहात झाली. यावेळी सहभागी धावपटूंचा उत्साह पाहून मॅरेथॉनला झेंडा दाखवल्यानंतर स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मॅरेथॉनमध्ये धावण्याचा आनंद घेतला. त्यांनी धावपटूंसमवेत काही अंतर धावून त्यांचा उत्साह वाढवला.


ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या ३१व्या वर्षा मॅरेथॉनचे रविवार सकाळी आयोजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरुष गटाच्या तर लता शिंदे यांनी महिला गटाच्या स्पर्धेला झेंडा दाखवला. त्यानंतर, टप्प्याटप्याने एकूण १२ गटातील स्पर्धांचा शुभारंभ महापालिका मुख्यालयासमोरील चौकातून करण्यात आला. याप्रसंगी, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी उपमहापौर पल्लवी कदम, महापालिका आयुक्त सौरभ राव, माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, परिवहन सेवेचे माजी सभापती विलास जोशी, माजी नगरसेवक पवन कदम, विकास रेपाळे, नम्रता भोसले, राजेश मोरे, सिद्धार्थ ओवळेकर, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, परिवहन व्यवस्थापन भालचंद्र बेहरे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, सचिन सांगळे, दिनेश तायडे, शंकर पाटोळे, मिताली संचेती, क्रीडा उपायुक्त मीनल पालांडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.


ठाणे वर्षा मॅरेथॉन थोड्या खंडानंतर आता पुन्हा होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. या क्षणी या मॅरेथॉनसाठी पहिल्यापासून पुढाकार घेणारे माजी खासदार सतीश प्रधान यांनी प्रकर्षाने आठवण होत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मॅरेथॉनला प्रारंभ करून देताना सांगितले. ठाणे बदलतंय आणि त्या बदलत्या ठाण्याबरोबर ठाण्यातील तरुणाईलाही उर्जा देण्याचे काम ही मॅरेथॉन करत आहे. म्हणूनच 'मॅरेथॉन ठाण्याची…उर्जा तरुणाईची’असे घोषवाक्य घेतले आहे. तू धाव, तू धाव...घे क्षितिजाचा ठाव हे गाणेही अत्यंत प्रेरणादायी असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.


ठाण्यात सप्टेंबर महिन्यात मेट्रोची ट्रायल रन होणार आहे. अंतर्गत मेट्रोचे कामही सुरू होत होत आहे. त्यामुळे ठाण्याचे रुप आणखी बदलेल. आपले ठाणे हरित होत आहे. यंदा दोन लाख झाडे लावण्याचा महापालिकेचा निश्चय केला असल्याचेही त्यांनी सांगितले.



खेळाडूंचा सत्कार


याप्रसंगी, इंग्लड ते फ्रान्स हे सागरी अंतर पोहून जाणाऱ्या भारतीय संघातील जलतरणपटू आयुषी कैलास आखाडे, आयुष प्रवीण तावडे, मानव राजेश मोरे या जलतरणपटूंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे, आतंरराष्ट्रीय अॅथलिट शौर्या अविनाश अंबुरे आणि फुल्ल आर्यनमॅन स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्मिता जावळे यांचाही उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



घरोघरी तिरंगा प्रतिज्ञा


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थित सगळयांनी याप्रसंगी, घरोघरी तिरंगा अभियानाच्या निमित्ताने मॅरेथॉनच्या व्यासपीठावर तिरंगा प्रतिज्ञा घेतली.



कॉर्पोरेट रन


महापालिका अधिकारी कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्यासाठी एक कि.मी ची 'कॉर्पोरेट रन' ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत महापालिका अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांनी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत महिला आणि पुरुष गटात ज्येष्ठ नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते. त्याचबरोबर, दिव्यांगांच्या त्रिदल समुहानेही या मॅरेथॉनमध्ये विशेष सहभाग घेतला.



एकूण १० लाखांची बक्षिसे


ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धा विविध १२ गटात झाली. विजेत्यांना एकूण १० लाख ३८ हजार ९०० रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली. मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकांमध्ये वाढ करण्यात आली. २१ कि.मी स्पर्धेतील विजेत्यास एक लाखांचे रोख पारितोषिक, सन्माचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

Comments
Add Comment

Kalyan Crime : कल्याण हादरले! १७ व्या मजल्यावरून क्रेन कोसळली; तरुण मजुराचा जागीच मृत्यू, तर दुसरा मृत्यूशी देतोय झुंज

कल्याण : कल्याण शहरात एका गगनचुंबी इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी भीषण अपघात घडला आहे. येथील विकास

ई-चलन न भरल्यास उमेदवारी अर्ज होणार बाद!

वाहतूक शाखेकडे इच्छुक उमेदवाराने भरले तब्बल दीड लाखांचे ई-चलन ठाणे : पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास

ठाणे ‘सिव्हिल’ने तरुणीला दिले नवे आयुष्य

अपघातग्रस्त तरुणीवर जबड्याची जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी ठाणे : नेरळ परिसरात झालेल्या अपघातात गंभीर जखमी

वनविभागाच्या कारवाईमुळे कल्याणमधील ४०० कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर

आपत्कालीन सेवांचा मार्ग खुंटला कल्याण : मांडा–टिटवाळा पूर्वेकडील विद्यामंदिर शाळेजवळील रस्ता पुन्हा चर्चेचा

मुरबाडमधील शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास सुरुवात

मुरबाड : मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाने सन २०२४-२५ या हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांची भातविक्रीसाठी ऑनलाईन

कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपमध्ये प्रवेश

उल्हासनगरात उबाठा सेनेला धक्का उल्हासनगर : उल्हासनगरमधील उबाठा गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून कल्याण