मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना कठोर शब्दात तंबी दिली आहे. कामगिरी नसलेल्या आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्या मंत्र्यांवर मंत्रिमंडळातून गच्छंती होण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या नुकत्याच झालेल्या प्रकरणानंतर शिंदे यांनी मंत्र्यांना 'माध्यमांमध्ये कमी बोला आणि काम जास्त करा' असा स्पष्ट सल्ला दिला आहे.
वादग्रस्त वक्तव्यांवरून नाराजी
शिंदे यांनी म्हटले की, वादग्रस्त वक्तव्यांमुळे मंत्र्यांचे वैयक्तिक नाव आणि पक्षाची प्रतिमा दोन्ही खराब होते. प्रत्येक आरोपाला उत्तर देणे आवश्यक नाही, कामातून विरोधकांना उत्तर द्यावे असेही त्यांनी बजावले. तसेच, मंत्र्यांना त्यांच्या जबाबदारीच्या जिल्ह्यांतून निवडणुकीत अपेक्षित निकाल मिळाले पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. शिंदे यांच्या या भूमिकेमुळे अडीच वर्षांच्या काळात कामगिरी नसलेल्या मंत्र्यांना फेरबदलाला सामोरे जावे लागेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पुणे : पुणे पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर छापा टाकून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक ...
मंत्र्यांच्या वर्तनावर नाराजी
यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या मंत्र्यांच्या वर्तनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांत मंत्री संजय गायकवाड, संजय शिरसाट आणि माणिकराव कोकाटे यांच्यासारखे मंत्री वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले होते. यानंतरच विधीमंडळात रमी खेळताना दिसलेल्या माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्यात आले.
शिंदेंचा दिल्ली दौरा आणि 'ऑपरेशन महादेव'
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा सलग दुसऱ्या आठवड्यातील दिल्ली दौरा चर्चेचा विषय ठरला आहे. या दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अमित शाह यांच्यासोबत जवळपास २५ मिनिटे एकांतात चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबासह पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी मोदींना शंकराची प्रतिमा भेट देताना, 'ऑपरेशन महादेव' च्या यशामुळे ही भेट दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.