जळगाव : वाळत घातलेले कपडे काढत असताना विजेचा धक्का लागल्याने ७१ वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरातील महाबळ परिसरात गजानन रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये घडली.
भावना राकेश जाधव (७१) असं मृत महिलेचं नाव असून याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. भावना जाधव या महाबळ परिसरातील गजानन रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचे पती पाटबंधारे खात्यातून सेवानिवृत्त झाले असून, मुलगा व्यावसायिक आहे. बुधवारी पती आणि मुलगा बाहेर गेलेले होते. त्या सून व मुलीसह घरी होत्या. त्यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या गॅलरीत तारेवर कपडे वाळत घातलेले होते.
दुपारी कपडे वाळल्यानंतर ते काढण्यासाठी गेल्या. तारेत विद्युत प्रवाह उतरल्याने शॉक लागून त्या खाली कोसळल्या. काहीतरी पडल्याचा जोरात आवाज आल्याने मुलगी आणि सून यांनी गॅलरीकडे धाव घेतली. त्यांना भावना कोसळलेल्या दिसताच त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांना घटनेची माहिती दिली. जखमी अवस्थेत भावना जाधव यांना जीएमसीत दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.