मुंबई : आर्थिक डबघाईस आलेल्या बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाची जबाबदारी आपल्या मर्जीतील सनदी अधिकाऱ्यावर सोपवण्यासाठी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभाग व नगर विकास विभागाचे वेगवेगळे शासन निर्णय जारी केले. मात्र मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी अतिरिक्त पदभार स्वीकारण्यास नकार दिल्याने वस्तू व सेवा कर आयुक्त आशीष शर्मा यांची बेस्ट महाव्यवस्थापक पदी नियुक्ती केल्याचे परिपत्रक राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केले. दरम्यान, आशीष शर्मा यांनी रात्री उशिरा पदभार स्वीकारला.
बेस्ट उपक्रमाचे माजी महाव्यवस्थापक एस व्ही.आर श्रीनिवास राव ३१ जुलै रोजी सेवा निवृत्त झाले. त्यानंतर बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदी कोण येणार कोणाची नियुक्ती होणार याकडे बेस्ट उपक्रमाचे लक्ष लागले होते. अखेर मंगळवारी रात्री नगर विकास विभागाने परिपत्रक जारी करत पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवल्याचे स्पष्ट केले. तर दुसरीकडे सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जारी करत आशीष शर्मा यांची महाव्यवस्थापक पदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले.
बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक एस व्ही.आर श्रीनिवास राव भाप्रसे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर वस्तू व सेवा कर आयुक्त आशिष शर्मा,भाप्रसे यांनी बुधवारी महाव्यवस्थापक पदाचा पदभार बुधवारी स्विकारला. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथून पब्लिक पॉलिसी अँड ऍडमिनिस्ट्रेशन या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे, तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली येथून बी. टेक. ही पदवी संपादन केली आहे. आशिष शर्मा भाप्रसे यांनी अतिरिक्त आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पाॅवर जनरेशन कार्पोरेशन लि., आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका इत्यादी महत्त्वाच्या विभागांचा कार्यभार पाहिला असून सद्ध्या वस्तू व सेवाकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.