मुंबई (वार्ताहर) : दूध भेसळीमुळे सर्वसामान्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हे रोखण्यासाठी दुधात कोणत्या प्रकारची भेसळ आहे, याचे त्वरित निदान होणे गरजेचे असते. त्यासाठी, अन्न व औषध प्रशासनाने पावले उचलली असून, ऑगस्ट महिन्यात ५० अद्ययावत पोर्टेबल दूध स्कॅनर उपलब्ध होणार आहेत. राज्यातील प्रयोगशाळांमध्ये मिल्कोस्कॅन यंत्रेही उपलब्धता करण्यात आली आहेत.
दूध भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन लवकरच ५० पोर्टेबल दूध स्कॅनर उपलब्ध करणार असून, जागेवरच दुधातील भेसळ शोधता येणार आहे. प्रयोगशाळांमध्ये अद्ययावत मिल्कोस्कॅन यंत्रे दाखल झाल्यामुळे दुधातील २५ प्रकारच्या भेसळी शोधणे शक्य होणार आहे. यामुळे सामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण दूध मिळेल आणि भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे सोपे होईल.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी याविषयी माहिती दिली. 'दूधामध्ये भेसळ असल्यास, अनेकदा त्याची प्रयोगशाळेमध्ये आणून चाचणी करावी लागते. मात्र या स्कॅनरच्या माध्यमातून जागेवरच चाचणी करता येईल, त्याद्वारे दुधामध्ये कोणत्या प्रकारची भेसळ आहे, हे त्वरित लक्षात येईल. सामान्यांना गुणवत्तापूर्ण व आरोग्यासाठी हितकारक दूध उपलब्ध करणे व त्याचवेळी या भेसळीवर कडक निर्बंध आणणेही गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रगत तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली आहे,' असे नार्वेकर यांनी सांगितले.
प्रयोगशाळांमध्ये मिल्कोस्कॅन यंत्रे पुरवली जाणार आहेत. 'एफटीआयआर' तंत्रज्ञानावर आधारित ही यंत्रे दूध, साय, लोणी तसेच इतर दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ कोणत्या प्रकारची आहे हे शोधतील. याद्वारे २५ वेगवेगळ्या प्रकारच्या भेसळी शोधणे शक्य होईल, असे अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले.