नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल, आयबी संचालक तपन कुमार डेगा, गृहसचिव गोविंद मोहन उपस्थित होते.
यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वतंत्रपणे भेट घेतली होती. या भेटीचे कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही. पण, राष्ट्रपती भवनाने दुपारी १२.४१ वाजता ट्विटरवर (एक्स) पंतप्रधानांनी आणि संध्याकाळी ६.३७ वाजता अमित शहांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्याचे सांगितले होते.
यासोबतच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्यासोबत बैठक घेतली. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या ६ वर्षे पूर्ण होण्याच्या एक दिवस आधी दिल्लीतील या बैठका झाल्या. बैठकांमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती समोर आलेली नाही. देशाच्या सध्याच्या सुरक्षा परिस्थितीवर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.