मॉस्को: रशियाच्या कामचटका प्रांतातील Petropavlovsk येथे ८.८ तिव्रतेचा भीषण भूकंप झाल्यानंतर आता याच ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याची बातमी समोर आली आहे.
रशियामध्ये ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच क्रॅशेनिनिकोव्ह (Krasheninnikov) ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. वैज्ञानिक आणि रशियाची राष्ट्रीय वृत्तसंस्था आरआयएने रविवारी याबद्दल माहिती दिली आहे. या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर यातून बाहेर पडणाऱ्या राखेचे लोट हे ६,००० मीटर उंचीपर्यंत पोहचल्याचे कामचटकाच्या आपात्कालीन परिस्थिती मंत्रालयाने म्हटले आहे. या ज्वालामुखीच्या उद्रेकाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रशियातील सरकारी माध्यमांनी जारी केलेल्या फोटोंमध्ये क्रॅशेनिनिकोव्ह ज्वालामुखीमधून मोठ्या प्रमाणात राखेचे लोट निघत असल्याचे दिसून येत आहेत. स्मिथसोनियन इंस्टिट्यूटशनच्या ग्लोबल वॉल्कॅनिझम प्रोग्रामनुसार यापूर्वी या ज्वालामुखीचा उद्रेक हा १५५० मध्ये झाला होता, त्यानंतर तब्बल ६०० वर्षानी हा उद्रेक झाल्याचे वृत्त एफपीने दिले आहे.
विमान सेवेवर परिणाम होण्याची शक्यता
युरोप आणि आशियामधील सर्वात उंच सक्रिय ज्वालामुखी Klyuchevskoy मधून बुधवारी लावा बाहेर पडल्याची माहिती समोर आली होती, आणि अगदी काही दिवसांतचा क्रॅशेनिनिकोव्ह ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. यामुळे विमान वाहतुकीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच या घटनेमुळे या भागातील विमान सेवेवर परिणाम होऊ शकतो, असेही सांगितले जात आहे.
राखेचे लोट हे ज्वालामुखीपासून पुर्वेकडे पॅसिफिक महासागराकडे पसरत आहेत. त्याच्या मार्गात कोणतीही लोकवस्ती नाही तसेच लोकवस्तीत कुठेही ज्वालामुखीची राख पडल्याची नोंद झालेली नाही, असे मंत्रालयाने म्हटले आहे.