पुण्यातील यवतमध्ये परिस्थिती नियंत्रणात
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात एका व्यक्तीने स्टेटसला एक संदेश ठेवला होता. या स्टेटसवरुन गावात शुक्रवारी १ ऑगस्ट रोजी हिंसा झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. आता यवतमध्ये संचारबंदी लागू आहे. विना परवानगी पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. याआधी चार दिवसांपूर्वी यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी तणाव निर्माण झाला होता. यावरुन यवतसह दौंड तालुक्यात बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. पोलिसांनी तपास करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्याला अटक केल्यानंतर वातावरण शांत झाले होते. पण शुक्रवारी स्टेटसवरुन हिंसा झाली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.
रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट
शरद पवारांनी यवत मधील परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी फोनवर सविस्तर चर्चा केली. या चर्चेचे तपशील अद्याप समजलेले नाहीत. विशेष म्हणजे पवारांनी फोन करण्याच्या आधीच शरद पवार आणि रोहिणी खडसे यांचीही सविस्तर चर्चा झाली होती. पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणात शरद पवार समर्थक रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर याला अटक झाली. कोर्टाने प्रांजलची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. यानंतर रोहिणी खडसे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. रोहिणी खडसे आणि शरद पवार भेटीनंतर शरद पवारांनी मुख्यमंत्र्याशी फोनवर चर्चा केली.