माथेरानमध्ये वीज, पाणी, वाहतूकही होते एकाच मार्गाने; स्थानिकांसह, पर्यटक, विद्यार्थ्यांचेही हाल
माथेरान : १८५० मध्ये माथेरान उदयास आले. नेरळ मार्गे माथेरान या एकाच मार्गाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे सद्यस्थितीत इथल्या पर्यटनाला चालना मिळत नाही. याठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा नेरळ मार्गे असल्याने आजवर स्थानिकांसह पर्यटकांना अनेक अडचणींचा सामोरे जाण्याची वेळ येत आहे. वीज, पाणी आणि वाहतूक व्यवस्था हे मुख्य स्त्रोत याच मार्गे आहे. त्यामुळे अनेकदा विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात.
वीज पुरवठा खंडित झाल्यास पाणीपुरवठा नियमितपणे होत नाही तर रहदारीसाठी याच घाट रस्त्यातून मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळे ऐन सुट्ट्यांच्या हंगामात वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांची तारांबळ उडते. मागील काळात २६ जुलै २००५ च्या अतिवृष्टीमुळे घाटरस्ता आणि मिनिट्रेनचा मार्ग वाहून गेला होता. त्यावेळी मिनिट्रेन सुद्धा जवळपास दोन वर्षे बंद करण्यात आली होती. सातत्याने विजेच्या लपंडावामुळे आर्थिक व्यवस्था कोलमडून जात असून याचा पर्यटनावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे.भविष्यात मोरबे धरणातून पाण्याचा उपसा करण्यासाठी प्रयत्न केल्यास पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो.
पनवेल मार्गे विजेचे कनेक्शन घेतल्यास बहुतेक समस्या दूर होण्यास मदत होईल. त्याचबरोबर प्रस्तावित असणारा रोप वे प्रकल्प शासनाने हाती घेतल्यास सर्व व्यवस्था सुरळीत होऊ शकते असे ज्येष्ठ स्थानिक मंडळी बोलत आहे.
महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पनवेल-धोदाणी-माथेरान या पर्यायी रस्त्याचा कोनशीला समारंभ होऊन जवळपास साठ वर्षे उलटून गेली तरीसुद्धा माथेरानकरांच्या या प्रमुख मागणीला अद्याप यश मिळाले नाही म्हणून माथेरानकरांसाठी अन्य पर्यायी मार्ग झाल्यास येथील वैद्यकीय, शैक्षणिक परिस्थितीत व येथील पर्यटन व्यवसायात सुधारणा होऊ शकते. नागरिकांच्या दळणवळणाकरिता नेरळ-माथेरान हा एकमेव मार्ग असल्याने नागरिक पर्यटकांना शालेय विद्यार्थ्यांना खडतर प्रवास करताना अतोनात हाल सोसावे लागत आहेत तसेच माथेरान शहराला होणारा वीज पूरवठा व पाणीपुरवठा याच मार्गांवर असल्याने यामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास येथील दुरुस्तीवर अवलंबून राहावे लागते.
पाणीपुरवठा सुरळीत होत नाही आणि मग तीन ते चार दिवसांसाठी बुकिंग असणारे पर्यटक पुन्हा माघारी फिरतात. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायावर देखील परिणाम होतो. याचा गांभीर्याने प्रशासन व राज्य सरकारने विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.
- चंद्रकांत जाधव, माजी उपनगराध्यक्ष