जामनगर : 'महादेवी' हत्तीण वनतारामध्ये सुरक्षितपणे पोहचली असल्याचं वनतारा प्रशासनाकडून सोशल मीडियाद्वारे कळवण्यात आलं आहे.
इन्स्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "माधुरी (महादेवी) आता वनतारा येथे सुरक्षितपणे पोहोचली आहे आणि तिथल्या वातावरणात स्थिर होत आहे. तिच्या आसपास तिची काळजी घेण्यासाठी, देखभाल करण्यासाठी वनताराचं पशुवैद्यकीय पथक आहे. तिच्यासाठी आवश्यक असणाऱ्या तात्काळ आणि दीर्घकालीन वैद्यकीय गरजांची हे पशुवैद्यकीय पथक काळजी घेत आहे."
काही कालावधीनंतर, जेव्हा ती त्या वातावरणात स्थिर होईल, तेव्हा तिला स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आणि इतर हत्तींच्या सहवासाचा आनंद घेता येईल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. ज्यांनी आत्तापर्यंत या हत्तीणीला प्रेम दिलं आणि तिची काळजी घेतली आहे, त्यांना वनतारा प्रशासनाकडून अगदी तशाच पद्धतीनं काळजी घेणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
'महादेवी' काही जण 'माधुरी'ही म्हणायचे. 1992 सालापासून ती नांदणी गावातल्या जैन समाजाच्या मठात वास्तव्याला होती. शिरोळ तालुक्यातल्या नांदणी गावात अनेक शतकांपासून जैन समाजाचा 'स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ' आहे. या मठाकडे 'महादेवी' हत्तीणीचं पालकत्व होतं आणि शेवटपर्यंत याचिकाकर्ते म्हणून मठानं सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई लढली.
पण, न्यायालयीन संघर्षानंतर या 'महादेवी' हत्तीणीला 33 वर्षांपासूनचं घर सोडावं लागलं आणि गुजरातच्या दिशेला प्रयाण करावं लागलं. वन्यप्राण्यांसाठी असलेली विशेषाधिकार समिती, उच्च न्यायालय आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुनावणी होऊन 28 जुलैला सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल आला. त्यानुसार या हत्तीणीला गुजरातच्या जामनगर इथं असलेल्या अंबानींच्या 'रिलायन्स फाऊंडेशन' च्या 'वनतारा' या संगोपन केंद्रात जावं लागलं.
कोल्हापूरच्या नांदणीतून लगेचच वनविभाग आणि 'वनतारा'च्या कर्मचाऱ्यांनी जामनगरला नेऊन 'वनतारा'चाच भाग असणाऱ्या 'राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट'च्या अखत्यारित दिलं.