नवी दिल्ली : पद्म पुरस्कार २०२६ साठी नामांकन/शिफारशी सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ वरून वाढवून १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत करण्यात आली आहे. या पुरस्कारांसाठी नामांकन/शिफारशी केवळ राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://awards.gov.in) वर ऑनलाईन स्वीकारल्या जातील. सन २०२६ च्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कार-२०२६ साठी नामांकन प्रक्रिया १५ मार्च २०२५ पासून सुरू झाली आहे.
पद्मश्री, पद्म भूषण आणि पद्म विभूषण, हे पुरस्कार देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहेत. १९५४ मध्ये स्थापित, हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केले जातात. ‘उत्कृष्ट कार्या’साठी हे पुरस्कार प्रदान केले जातात. कला, साहित्य आणि शिक्षण, खेळ, वैद्यक, समाजसेवा, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक कार्य, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यासारख्या सर्व क्षेत्रांमध्ये विशिष्ट आणि असाधारण उपलब्धी/सेवांसाठी हे पुरस्कार दिले जातात. जात, व्यवसाय, पद किंवा लिंग यांचा भेद न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. मात्र, डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता इतर सरकारी कर्मचारी, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये काम करणारे कर्मचारी, या पुरस्कारांसाठी पात्र नाहीत.
भारत सरकारने पद्म पुरस्कारांना “लोकांचे पद्म” बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना नामांकन/शिफारशी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिक स्वतःलाही नामांकन करू शकतात. विशेषतः महिला, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती आणि जमाती, दिव्यांग व्यक्ती आणि समाजासाठी निस्वार्थ सेवा करणाऱ्या प्रतिभावान व्यक्तींची ओळख करून त्यांच्या उत्कृष्टता आणि उपलब्धींना मान्यता देण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याचे आवाहन आहे.
नामांकन/शिफारशींमध्ये पोर्टलवर उपलब्ध असलेल्या नमुन्यात सर्व संबंधित तपशील असावेत, यामध्ये नामित व्यक्तीच्या संबंधित क्षेत्रातील विशिष्ट आणि असाधारण उपलब्धी/सेवांचा स्पष्ट उल्लेख असलेला ८०० शब्दांचा वर्णनात्मक उद्धरण (citation) समाविष्ट असावा.
यासंदर्भातील सविस्तर माहिती गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (https://mha.gov.in) ‘पुरस्कार आणि पदक’ या शीर्षकाखाली आणि पद्म पुरस्कार पोर्टलवर (https://padmaawards.gov.in) उपलब्ध आहे. पुरस्कारांशी संबंधित अधिक माहिती आणि नियम https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx या लिंकवर उपलब्ध आहे.