पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत घमासान सुरू आहे. याच चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे राजकीय वादाला तोंड फुटलंय. प्रणिती शिंदे नेमक्या काय म्हणाल्या आणि काँगेसने काय भूमिका घेतली तसंच प्रणिती शिंदेंच्या वक्तव्यानंतर समाजमाध्यमात काय प्रतिक्रिया उमटल्या, भाजपाने प्रणिती शिंदेंचे कसे कान टोचले, पाहूयात त्याचा खास रिपोर्ट
नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूजलाईनमध्ये आपलं स्वागत करते
पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरून लोकसभेत जोरदार चर्चा सुरू आहे. प्रश्न आणि उत्तर यांचं घमासान सुरू आहे. त्यातच काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आणि वादाची ठिणगी पडली. प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरला 'तमाशा' असं संबोधलं आणि केंद्र सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले. 'ऑपरेशन सिंदूर हा सरकारचा केवळ मीडियासाठी तमाशा होता. यात किती दहशतवादी मारले गेले? किती लढाऊ विमाने गमावली? कोण जबाबदार आहे? याचं उत्तर सरकारनं द्यावं.' अशी मागणी प्रणिती शिंदेंनी केली. प्रणिती शिंदे यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावरही टीका केली. अमेरिकेच्या दबावामुळे युद्धबंदी झाल्याचा आरोपही केला. त्यातच प्रणिती शिंदे यांचं हे वक्तव्य काँग्रेसच्या रणनीतीचा भाग आहे की वैयक्तिक मत आहे, याच्यावर चर्चा झडू लागल्या. मात्र प्रणिती शिंदे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर चौफेर टीका होऊ लागलीय. प्रणिती शिंदे यांच्यावर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी निशाणा साधलाय. 'भर संसदेत भारतीय सैन्याच्या शौर्याला ‘तमाशा’ म्हणताना प्रणिती शिंदेंना लाज वाटली नाही का?' असा थेट सवाल चित्रा वाघ यांनी एक्सपोस्टमध्ये उपस्थित केलाय. सैनिकांमुळे तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत, त्यामुळे उपेक्षेची भाषा कशी करता असा सवालही उपस्थित केलाय. ही पोस्ट त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि इतर भाजपा नेत्यांना टॅग करत काँग्रेसवरही निशाणा साधलाय. चित्रा वाघ यांनी प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याला सैन्याच्या शौर्याचा अपमान असल्याचं म्हटलंय. त्यांच्या या एक्सपोस्टला भाजपाचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठा पाठिंबा दिलाय. चक्क सोलापुरात प्रणिती शिंदेंविरोधात भाजपाने आंदोलन केलंय. याशिवाय चित्रा वाघ यांनी प्रणिती शिंदे यांना सैन्याच्या बलिदानाची आठवण करून दिली आणि त्यांच्या वक्तव्याला 'काँग्रेसची पाकिस्तानप्रेमी मानसिकता' असंही म्हटलंय.
प्रणिती शिंदे यांचं वक्तव्य आणि चित्रा वाघ यांची टीका यामुळे राजकीय वातावरण तापलंय. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर हे राष्ट्रीय सुरक्षेचे संवेदनशील मुद्दे आहेत. मात्र प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरला ‘तमाशा’ म्हणत वादाला तोंड फोडलंय. तर सैन्याच्या शौर्याला तमाशा म्हणणाऱ्याला जनता कधी माफ करत नाही, असं म्हणत चित्रा वाघांनी प्रणिती शिंदेंना लक्ष्य केलंय. इतकंच नव्हे तर चित्रा वाघ यांनी प्रणिती शिंदेंना एक सल्लाही दिलाय. 'नाही तेथे तृष्टीकरणाचं राजकारण करायला जाऊ नका, हा केवळ भारतीय सैनिकांचा अपमान नाही तर प्रत्येक देशभक्त आणि नागरिकांच्या अस्मितेवरचा घाव आहे, असंही त्यांनी एक्सपोस्टमध्ये म्हटलंय. प्रणिती शिंदेंच्या या वक्तव्याचा चित्रा वाघांनीच नाही तर खुद्द पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचा समाचार घेतलाय. 'काँग्रेसच्या नवख्या खासदाराला माफ करायला पाहिजे. कारण नवख्या खासदारास काय म्हणायचे आहे हे काँग्रेसचे आका त्यांना लिहून देतात, कारण काँग्रेसच्या आकाला हिंमत नसते,' असा हल्लाबोल पंतप्रधान मोदींनी केलाय. दरम्यान प्रणिती शिंदे यांनी वादग्रस्त वक्तव्यावर माफी मागण्यास नकार दिलाय. आम्हाला देशभक्तीचे धडे देऊ नका, मी माझ्या विधानावर ठाम आहे आणि भाजपाच्या ट्रोलर्सची माफी कधीच मागणार नाही,' असं प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत. वादग्रस्त वक्तव्य करून प्रणिती शिंदेंनी अडचणी वाढवून घेतल्या आहेत. या वादाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर काय परिणाम होईल? आणि प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याचा काँग्रेसच्या प्रतिमेवर काय परिणाम होईल? हे येत्या काळात स्पष्ट होईल, एवढं मात्र निश्चित. तुम्हाला काय वाटत हे कमेंट्समध्ये नक्की कळवा.. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद