नवी दिल्ली: राज्यसभेत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर मोठे विधान केले. हे केवळ युद्ध नव्हते, तर आत्मरक्षणाचे कृत्य होते, असे शाह म्हणाले.
काय म्हणाले अमित शाह?
राज्यसभेत बोलताना अमित शाह म्हणाले, "पहलगाममध्ये धर्माच्या आधारावर ओळख पटवून ज्या नागरिकांची हत्या झाली, त्यांच्या कुटुंबीयांप्रति मी संवेदना व्यक्त करतो. तसेच 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात ज्या लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांप्रतिही मी संवेदना व्यक्त करतो."
शाह यांनी पुढे सांगितले, "२२ एप्रिल रोजी ज्या दिवशी हा हल्ला झाला, त्या दिवशी मी पंतप्रधानांशी बोललो होतो. तेव्हा एका नव्याने विधवा झालेल्या मुलीला मी पाहिले होते. या हत्यांचा उद्देश असा संदेश देणे होता की, काश्मीर दहशतवादमुक्त होणार नाही. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की, काश्मीर नक्कीच दहशतवादमुक्त होईल."
मागील काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातील दहशतवादी घटनांवर टीका करताना शाह म्हणाले की, त्यांच्या काळात झालेल्या हल्ल्यांसाठी जबाबदार असलेले दहशतवादी त्यांच्या (भाजप) सरकारच्या काळात लष्करी कारवाईत मारले गेले. त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'ला दहशतवाद्यांच्या मनोधैर्यावर केलेला हल्ला असे संबोधले.